कल्याण : पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना चहा देणाºया विक्रेत्याने दिलेल्या टीपच्या आधारावर पंपावर जमा होणारी रक्कम लुटल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी चहाविक्रेत्यासह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातील पेट्रोलपंपावर जमा झालेली १२ लाख ४० हजारांची रोकड आणि सव्वातीन लाखांचे चार धनादेश घेऊन प्रदीप सिंह हे बँकेत भरण्यासाठी चालले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चौकडीने पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या हातातील बॅग खेचून पोबारा केला होता.
ही ३१ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास मुरबाड रोडवरील विजयबाग परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सचिन शिरोडकर (२३), सोमनाथ ऊर्फ गणेश खंडागळे (२०), नितीन पवार (२८), रूपेश म्हात्रे (२७), त्यांना मदत करणारा रोहिदास ऊर्फ सोनू सुरवसे (२५) आणि चहाविक्रेता वैभव भास्कर (२१) या सहा जणांना अटक केली.
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, सुरेश डांबरे, चोरीप्रतिबंधक पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळदे व त्यांच्या पथकानेही कारवाई केली.
आरोपींविरोधात गंभीर गुन्हेपेट्रोलपंपापासून हाकेच्या अंतरावर चहा विकणाºया वैभवने पेट्रोलपंपावर जमा होणाºया रकमेबाबतची माहिती गुन्ह्यातील मुख्य आरोपी रूपेशला दिली होती. त्यानंतर रूपेशने सचिन, सोमनाथ आणि नितीनच्या मदतीने कट रचून दिवसाढवळ्या रोख रक्कम लुटत पोलिसांना आव्हान दिले होते. या चौकडीने ही रोकड खेचून पोबारा केल्यानंतर त्यांना पोलिसांपासून वाचवण्याचे काम रोहिदासने केले होते.विशेष म्हणजे रूपेश, सचिन आणि सोमनाथ यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत.