ठाणे : येथील तीनहातनाक्यावरील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. च्या ‘जयमलसिंग आॅटोमोबाइल’ या पेट्रोल पंपावरील पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याची तक्रार सोमवारी रात्री ग्राहकांनी केली तिची दखल घेऊन शीधावाटप अधिका-यांसह बीपीसीएलच्या अधिका-यांनी मंगळवारी दिवसभर केलेल्या तपासणीत मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे आढळल्याने या पंपचालकांने सुटकेचा नि:श्वास टाकला.तीनहातनाक्याजवळ असलेल्या या पंपावर भेसळयुक्त पेट्रोल मिळत असल्याची तक्रार काही ग्राहकांनी सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास केली. दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर गाड्या बंद पडत असल्याच्या तक्रारी त्यांनी पंप चालकांकडे केल्या. आपल्या पेट्रोलमध्ये रॉकेल थिनरचा वास येत असल्याचाही काहींनी आरोप केला. त्यामुळे त्यांच्यापैकीच काहींनी वाहनातील पेट्रोल बाटलीमध्ये भरले. तेंव्हा त्यात अंशत: काही प्रमाणात पाणी असल्याचा आरोप या ग्राहकांनी केला. ही चर्चा बºयाच ठिकाणी पसरल्यानंतर मध्यरात्री पंपावर ग्राहकांनी मोठी गर्दी करून आपला संताप व्यक्त केला. अखेर वागळे इस्टेट पोलिसांनी यात मध्यस्थी करून पंपावरील पेट्रोलचे वितरण थांबविले. सकाळी १० वाजल्यापासून बीपीसीएलचे ठाणे क्षेत्रीय व्यवस्थापक पुनित झायडू तसेच त्यांच्या मोबाइल प्रयोगशाळेने या पंपावरील तिन्ही टाक्यांमधील पेट्रोलची जागीच तपासणी केली. यात कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी सुंदर राजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पेट्रोलमध्ये भेसळीचा केवळ संशय व्यक्त केल्यानंतर कंपनीने तातडीने याची दखल घेऊन सर्व नमुन्यांची रात्री आणि सकाळीही तपासणी केली. मात्र, कुठेही भेसळ आढळली नसल्याचे ते म्हणाले.
ठाण्यात भेसळयुक्त इंधनाच्या संशयावरून पेट्रोलपंप बंद, प्राथमिक तपासणीत आरोप निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 9:47 PM