उल्हासनगरात स्वातंत्रदिनानिमित्त काँग्रेसकडून छायाचित्र प्रदर्शन, स्वातंत्र सैनिक कुटुंबाचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:25 PM2021-08-16T19:25:23+5:302021-08-16T19:25:54+5:30
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उल्हासनगर: स्वातंत्रदिना औचित्य साधून काँग्रेस पक्षाने स्वातंत्रपूर्व लढ्यातील पक्षाच्या योगदानाबद्दलचे छायाचित्र प्रदर्शन हिरा मॅरेज हॉलमध्ये आयोजित केले होते. यावेळी स्वातंत्र सैनिक सन्मुख माखीजा व परचाराम आयलानी (विध्यार्थी) यांच्या कुटुंबाचा सत्कार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पक्ष्याच्या कार्यालयात शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यानंतर हिरा मॅरेज हॉलमध्ये पक्षाच्या प्रभारी राणी अगरवाल, माजी महापौर हरदास माखीजा, मालती करोतीया, प्रदेश सचिव डॉ. जयराम लुल्ला, गटनेता अंजली साळवे, यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी पक्षाचे नेते अमरलाल छाब्रिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वतंत्र लढ्यात भाग घेणाऱ्या शहरातील सन्मुख मखीजा व माजी आमदार परचाराम आयलानी (परचो विद्यार्थी) या स्वतंत्रसैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशाच्या सीमेवर कर्तुत्व गाजवणारे मेजर मच्छिंद्र खोंड यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.
पक्षाच्या व्यर्थ न हो बलिदान उपक्रमांतर्गत हिरा मॅरेज हॉलमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनामध्ये काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश राजवटी विरोधात केलेले सत्याग्रह आंदोलन आणि अधिवेशन यांची सचित्र माहितीही मांडण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी काँग्रेसचे देशाच्या स्वतंत्र संग्रामातील योगदान यावर प्रकाश टाकला. तसेच काँग्रेस पक्ष यापुढेदेखील जातीयवादी आणि धर्मांधवादी विचारधारेच्या विरोधात लढत राहील याची ग्वाही दिली. कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.