लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : काँग्रेसची ठाण्यातील ताकद पुन्हा वाढविण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार आता ठाण्यात पहिल्यांदाच राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी विस्तारित कार्यकारिणीच्या १० एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीनिमित्त अवतरणार आहे. यावेळी स्वांतत्र्यासाठी योगदान दिलेल्यांची यात्रा काढली जाणार असून, त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही छायाचित्र असेल आणि त्यांचाही सन्मान केला जाणार आहे.
काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेश कार्याध्यक्ष, सहप्रभारी आदींसह इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सोमवारी सकाळी ११ वाजता बैठक होईल.
यात नवीन कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठरावही केले जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. तसेच यानिमित्ताने जय भारत यात्रेचा प्रारंभ केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी सत्याग्रह आणि स्वातंत्र्यवीरांची रॅलीदेखील काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘...त्यामुळे घेतली सन्मानाची भूमिका’
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वेगळी भूमिका घेतली असताना शहर काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असणार आहे. याबाबत शहराध्यक्ष चव्हाण म्हणाले की, सावरकरांचादेखील सन्मान केला जाणार आहे. सावरकर हे मराठी असून, ते महाराष्ट्रातील होते. त्यामुळे त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.