मीरा रोड : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी बुधवारी महापालिका परिसरात प्रचंड बंदोबस्त असतानाही चोरांनी नेत्यांच्या खिशांवर हात साफ करुन आपण पोलिसांपेक्षा वरचढ असल्याचे दाखवून दिले. या गर्दीत चोरांनी काही नेत्यांची पाकिटे मारली असून, महत्त्वाचे म्हणजे हे सर्व नेते भाजपचेच आहेत.निवडणुकीमुळे पालिका परिसरात बुधवारी नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. पालिकेतील तापलेले वातावरण पाहता येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र या बंदोबस्तातही चोरांनी भाजपचे नगरसेवक सचिन म्हात्रे यांचे ३७ हजारांचे पाकीट मारले. नगरसेविका दीपिका अरोरा यांचे पती पंकज अरोरा यांचेही २८ हजारांचे पाकीट चोरांनी लंपास केले. दोघांनी याबाबत भार्इंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय नवनिर्वाचित उपमहापौर हसमुख गहलोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, तसेच भाजपचे माजी नगरसेवक अनिल भोसले यांचीही पाकिटे चोरांनी मारली. मात्र त्यांनी वृत्त लिहेस्तोवर पोलिसांकडे तक्रारी दिल्या नव्हत्या. पालिका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले जात असून, त्यात पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेली एक संशयास्पद व्यक्ती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाईंदरमध्ये भाजप नेत्यांची पाकिटे केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:33 AM