सदानंद नाईक, उल्हासनगर : रस्त्यातील धोकादायक खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता मनसे वाहतूक सेनेने व्यक्त करून खड्ड्या भोवती रांगोळी काढत फोटो काढले. खड्ड्याचे काढलेले फोटो आयुक्तांच्या दालनाला चिपकुन संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगर महापालिका रस्ता बांधणी व दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली. तर नवीन बांधलेले रस्ते निकृष्ट दसर्जचे असल्याचा आरोप होत असल्याने, महापालिका बांधकाम विभाग वादात सापडला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यावर, महापालिका बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू केले होते. मात्र संततधार पावसाने भरलेले खड्डे जैसे थे झाले आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्डयाने अपघात होण्याची शक्यता मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष काळू थोरात यांनी व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्या भोवती रांगोळी काढून त्याचे फोटो सेक्शन केले आहे. रस्त्याच्या खड्ड्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेतील आयुक्त कार्यालया समोर एकत्र येत दालनाला फोटो चिपकविण्यात आले आहे.
महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी रस्त्यांवर खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाल्याचा मनसे वाहतूक सेनेकडून निषेध व्यक्त केला. रस्त्यातील खड्डे प्रकरणी ठेकेदार व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आयुक्त अजीज शेख महापालिकेत नसल्याने, शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना खड्ड्या बाबत निवेदन दिले. तसेच आयुक्त व शहर अभियंता संदीप जाधव यांचें लक्ष वेधण्यासाठी दालनाच्या बाहेर खड्ड्याचे फोटो लावले आहे. यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, शैलेश पांडव, अँड.कल्पेश माने, संजय नार्वेकर, बादशहा शेख, अमित फुंदे, अश्फाक शेख, संजय चकोर, जगदीश माने, प्रदीप कुंवर तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.