अंबाडी : भिवंडी-वाडा महामार्गावर अंबाडीनाका येथील उड्डाणपुलाखालील टपऱ्या गुरुवारी जमीनदोस्त केल्या. दोन वर्षांपासून टपऱ्यांनी हा परिसर व्यापून टाकला होता. या टपऱ्या पाडण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.अंबाडीनाक्यावर तीन वर्षांपूर्वी उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, याचा फायदा घेऊन काही जणांनी दोन ते तीन लोखंडी टपऱ्या या पुलाखाली बांधून छोटे व्यवसाय सुरू केले. त्यास मिळणारा प्रतिसाद पाहता या ठरावीक जणांनी पुलाखाली टपऱ्या बांधून महिना तीन ते चार हजार रु पये दराने भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. टपऱ्यांच्या विळख्यामुळे वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर अंबाडी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे या टपऱ्यांकडे लक्ष वेधले. मात्र, प्रशासनाने याकडे कानाडोळा केला. टपऱ्या हटवण्यासाठी मेरी ही संस्था न्यायालयात गेली. या उड्डाणपुलाखालील टपऱ्यांसह सर्व प्रकारची अतिक्र मणे त्वरित हटवून केलेल्या कारवाईचा अहवाल १८ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, अंबाडी, झडिके ग्रामपंचायतीला दिले. त्यामुळे या सर्वांनी गुरुवारी सकाळपासून कारवाईला सुरुवात केली. स्थानिक पोलीस व दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात कारवाई केली. (वार्ताहर)
अंबाडीतील टपऱ्या अखेर तोडल्या
By admin | Published: January 13, 2017 6:46 AM