कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या फूल बाजारात फुलांना ग्राहक नसल्याने बाजारात फुलांचा माल सडत आहे. त्यामुळे फुलांचा माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ फूल विक्रेत्यांवर आली आहे.
कोरोनामुळे मार्चपासून फूल बाजार बंद होता. त्यावेळी भाजीपाला मार्केट सुरु होते. फूल बाजार अत्यावश्यक बाबींमध्ये मोडत नसल्याने फूल बाजार बंद होता. अनलॉकच्या प्रक्रियेत फूल बाजार सुरु झाला. त्यावेळी फूल मार्केटमधील विक्रेत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. नवरात्र व दसऱ्याला झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळतो. मात्र, परतीच्या पावसाने फुलशेतीला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक फूल शेतकऱ्यांचा माल शेतातच खराब झाला. जो काही चांगला झेंडू होता. तो बाजारात आला. पण, पावसामुळे फुलांचा माल सडला.
तसेच, कोरोनामुळे मंदिरे अद्याप उघडली नाहीत. त्यामुळे मंदिरे सजविण्यासाठी किंवा लोक फुलांचे हार विकत घेत नाहीत. अशा परिस्थित बाजारात फुलाला मागणी मिळाली नाही. काहीशी घरगुती हारासाठी फुले जात होती. त्या फुलांना आता परतीच्या पावसाने फटका बसला आहे.सोमवारी बाजार समितीत फुलांचा माल असलेल्या२५ गाड्या आल्या. मात्र, या मालाला मागणी नाही. तसेच, पावसामुळे माल भिजल्याने फुले रस्त्यावर फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली.