टिटवाळा : टिटवाळा स्थानकात एकमेव असलेल्या रेल्वे पुलाची दुरवस्था झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी चालत असताना या पुलाला हादरे बसतात. धोकादायक झालेला हा पूल कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावरून जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहेत.टिटवाळा स्थानकात दररोज सव्वा लाख प्रवासी या पुलावरून येजा करतात. संकष्टी व अंगारकी चतुर्थी या दिवशी गणेश मंदिरात दर्शनासाठी सुमारे पाच लाख भाविक टिटवाळ्यात हजेरी लावतात. महिनाभरात या स्थानकातून दोन कोटी ३१ लाख ९६ हजार १९१ रुपयांची कमाई रेल्वेला होते. मात्र, या स्थानकात पूर्व-पश्चिमेला जाण्यासाठी एकच पूल आहे. पर्यायी पूल नसल्याने या पुलावर गर्दी होत आहे.मुंबईतून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांनी टिटवाळ्यात घरे घेतली आहेत. त्यामुळे या भागात लोकवस्ती वाढत आहे. सध्या टिटवाळा स्थानकात रेल्वेने नवीन पुलाचे काम हाती घेतले आहे. मात्र, ते कासवगतीने सुरू आहे. जुना पूल प्रवाशांच्या वजनाने हादरत आहे, असे प्रवासी पंकज महाडिक यांनी सांगितले. या पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर काही ठिकाणी गंजले आहे. तसेच स्थानकातील गर्दीला सामावण्यासाठीही हा पूल अपुरा पडत असल्याने एल्फिन्स्टन स्थानकाप्रमाणे चेंगराचेंगरी किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळण्यासारखी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या धोक्यांकडे रेल्वे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. हा पूल १९६८ मध्ये बांधण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे श्रीनिवास कºहाडकर यांना माहिती अधिकारात मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी या पादचारी पुलाचा काही भाग खचला होता. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करून पूल रहदारीसाठीसुरू ठेवला.>आश्वासने हवेतच विरली!२०१७ मध्ये आॅक्टोबरला मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. यादरम्यान टिटवाळा पूर्व प्लॅटफॉर्म क्र मांक-१ च्या बाजूस तिकीट काउंटरपर्यंत पेव्हरब्लॉक टाकणे, प्लॅटफॉर्म क्र .१ वर अतिरिक्त जिना बनवणे, प्लॅटफॉर्म क्र . १ व २ वर जिन्याखाली मुतारी बांधणे, या सोयीसुविधा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासी व रेल्वे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.या पाहणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असल्याचेही त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, सध्या तरी हा बोलाची कढी आणि बोलाचा भात ठरला आहे.
टिटवाळा रेल्वेस्थानकातील पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:46 PM