- प्रशांत सुमती भालचंद्र ठोसरशिवविचारांचे पाईक असणाऱ्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भीमथडीची तट्टं नर्मदेपार नेली. छत्रपती शाहू महाराजांच्या या मराठा सैन्याची वावटळ सोसायला भल्याभल्यांना अवघड गेलं, त्याचं कारण बाजीरावांनी हिंदुस्थानात रोवलेले दख्खनदौलतीचे चार मजबूत आधारस्तंभ.हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे कालवश झाले होते. छत्रपती शाहू महाराजांचा अंमल सुरू झालेला होता. वारसाहक्काने कोणती गादी मानायची, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम पूर्णत: दूर झालेला नव्हता. शाहू महाराजांनी प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून आधी बाळाजीपंत विश्वनाथ भट व त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव यांना पंतप्रधान पेशवाईची जबाबदारी सोपवली होती. बाळाजी विश्वनाथ व आता थोरले बाजीराव हे सक्षमपणे शिवसैन्याचा डंका उत्तरेकडे समशेरी रोखून धाडसाने व अजिंक्य विश्वासाने वाजवत होते. भलेभले सरदार, राजे, निजाम हे बाजीरावांची रणनीती ओळखण्यात चुकत होते. बाजीरावांचा झंझावात रोखणे, हे त्यांना जवळपास अशक्यच वाटत होते.थोरल्या बाजीरावांनी दूरदृष्टीने एकेक करत आपले बलवत्तर मोहरे मध्य हिंदुस्थानच्या पटावर ठेवायला सुरुवातही केली. यांच्यापैकी एक तालेवार घराणे होते, शिंदे यांचे. या घराण्याचे मूळ पुरुष होते, राणोजीराव शिंदे. हे महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील कण्हेरखेडा येथील ‘पाटील’. यांचे अत्यंत विश्वासू वर्तन बघून बाजीरावांनी यांना समृद्ध माळवा प्रांतात छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने चौथाई वसुलीसाठी (उत्पन्नाच्या २५ टक्के कर) नामजाद केले व सरदेशमुखीचे हक्कही प्रदान केले. राणोजीरावांनी आता मध्य हिंदुस्थानात उज्जैन येथे आपले बस्तान बसवले व कालांतराने तेच शिंदे संस्थानिकांचे राजधानीचे ठिकाण गणले जाऊ लागले. पेशव्यांचे पर्यायाने शाहू छत्रपतींचे निष्ठावान असणारे राणोजीराव शिंदे बाजीरावांच्या १७४० मधील अकाली मृत्यूनंतर १७४५ मध्ये मरण पावले. त्यांच्या पश्चात जयाप्पाराव, दत्ताजीराव, ज्योतिबाराव व तुकोजीराव तसेच महादजीराव असे पुत्र होते. जयाप्पाराव आता शिंदेशाहीचे वारसदार म्हणून कारभार बघू लागले. त्यासमयी त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६५ लाख रुपये इतके होते. जयाप्पाराव इ.स. १७५६ मध्ये नागौर येथे मारले गेले. त्यांना मुलगा होता, त्याचे नाव जनकोजी. पण, राज्यकारभार मात्र बंधू दत्ताजीरावच बघत होते. दुर्दैवाने दत्ताजीराव शिंदे पानिपतच्या समरप्रसंगी अब्दालीकडून ऐन युद्धात वीरगती प्राप्त करते झाले. अब्दालीने जबर जखमी झालेल्या दत्ताजीरावला कुत्सितपणे विचारले, ‘क्यों पटेल, और लडोगे क्या ? मृत्यू समोर असतानाही दत्ताजी बाणेदारपणे त्यास म्हणाला, ‘ हाँ, बचेंगे तो और भी लडेंगे.’ इतिहासात हे उद्गार अजरामर झाले आहेत. अर्थातच, दत्ताजीराव ताबडतोब मारले गेले. जनकोजीराव शिंदेदेखील पानिपतच्या १७६१ मधील युद्धात बंदी होऊन अखेर मारले गेले. आता पानिपतच्या लढाईत वाचलेल्या महादजीराव शिंद्यांवर ग्वाल्हेर संस्थानाची धुरा येऊन पडली. ग्वाल्हेर संस्थानचा इतिहास तसेच पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा या कर्तृत्ववान महादजीराव शिंदे यांच्या योगदानाचा यथोचित आढावा घेतल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही, असे म्हटले तर ते गैरलागू ठरू नये.महादजीराव पानिपतच्या नंतर महाराष्ट्रात परतले व आपले स्थान भक्कम करून पुनश्च १७६४ मध्ये माळव्यात आले. महादजीराव व त्यांच्या दीर्घ कारकिर्दीनंतर शिंदे घराण्यातील राजांनी आपापली अनेक वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाडली. सोन्याच्या मोहरा, चांदीचे रुपये, तांब्याचे पैसे यांचा समावेश आहे. शिंदे घराण्याची नाणी व टांकसाळी यांची माहिती घेणार आहोत
पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ - ग्वाल्हेरचे शिंदे घराणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:10 AM