उल्हासनगर : नेताजी चौकातील महापालिका प्रभाग समिती क्र. ४च्या इमारतीचा खांब खचल्यामुळे प्रभाग समिती व अग्निशमन दलाचे कार्यालय इतरत्र हलविण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. धोकादायक घोषित केलेल्या इमारतीच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करून इमारतीत प्रभाग समिती कार्यालय थाटण्यात आले होते.
उल्हासनगरात बेकायदा व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेताजी चौकातील प्रभाग समिती क्र. ४च्या कार्यालयाच्या इमारतीचा खांब खचला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत रिकामी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे येथील कार्यालय महापालिका शाळा क्र. १९मध्ये हलविण्यात येत आहे. तसेच, इमारतीमधील अग्निशमन दलाचे कार्यालय व गाड्या नेताजी चौकातील जुन्या प्रभाग समिती कार्यालयाच्या ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. महापालिकेने यापूर्वीच धाेकादायक घाेषित केलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीवर राजकीय नेत्यांच्या हट्टापायी तत्कालीन आयुक्तांनी आठ वर्षांपूर्वी कोट्यवधींचा खर्च केला हाेता.
प्रभाग समिती क्र. ४ पाठाेपाठ व्हीटीसी मैदान संकुलातील क्रीडा संकुल इमारतीमध्ये असलेले प्रभाग समिती क्र. ३चे कार्यालय इतरत्र हलविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या जागेवर भव्य क्रीडा संकुल उभे राहणार आहे. पुढील महिन्यात क्रीडा संकुलाचे काम सुरू होण्याचे संकेत महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. एकीकडे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असताना बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे.
चौकट
मुख्यालय इमारतीलाही गळती
महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारतीच्या पार्श्वभूमीवर १० वर्षे जुन्या इमारतींना सरसकट १५०० पेक्षा जास्त इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या, तर दुसरीकडे महापालिका मुख्यालय इमारतीला गळती लागली आहे. या मुख्यालय इमारतीमधील विविध कार्यालयांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नागरिक करत आहेत.