- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज शहरातील १०० दारिद्रय रेषेखालील महिलांना ‘गुलाबी’ रिक्षांचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र या रिक्षा वाटपात लाभार्थ्यांना पालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत देय असलेल्या अनुदानाचा आकडाच मात्र अनिश्चित असल्याने सध्या या रिक्षा महिलांना स्वखर्चानेच मिळवाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या महिला दिनी शहरातील दारिद्रय रेषेखालील महिलांना पहिल्या टप्प्यात १०० गुलाबी रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय समितीने घेऊन तसा ठरावही २० फेब्रुवारीच्या महासभेत मंजुर करण्यात आला. त्यावेळी राज्य सरकारच्या निर्देशानुसार इंडो-इस्त्रायल चेंबरद्वारे १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ई-रिक्षा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, परिवहन विभागाने अद्याप ई-रिक्षाला मान्यता न दिल्याने त्या रिक्षा खरेदीचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्याऐवजी १ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या सीएनजी रिक्षा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सुरुवातीला १० रिक्षा देखील खरेदी करण्यात आल्या. रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण पालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत मोफत दिले जाणार असले तरी रिक्षाचे परमिट, बॅज, तात्पुरता व कायमस्वरुपी परवाना व विमा काढण्यासाठी मात्र लाभार्थी महिलेला २५ हजार रुपये इतकी रक्कम विभागाकडे जमा करावी लागणार आहे. या रिक्षा मिळविण्यासाठी अद्याप २५ महिलांनी विभागाकडे अर्ज केले असुन त्यातील १० लाभार्थी महिलांनाच महिला दिनी रिक्षांचे वाटप केले जाणार आहे. उर्वरीत १५ महिलांच्या अर्जांची छाननी करुनच त्यांना रिक्षा दिल्या जाणार आहेत. रिक्षाच्या खरेदीसाठी याच विभागाच्या माध्यमातून लाभार्थी महिलेला राष्ट्रीयकृत बँकेकडून माफक दरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मात्र त्यात विभागाकडील अनुदानाचा वाटा किती राहिल, त्याचा आकडाच अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे तुर्तास लाभार्थी महिलांना स्वखर्चासह कर्जाद्वारेच रिक्षा मिळवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाभार्थी महिलेला रिक्षा मिळाल्यानंतर ती इतरांना परस्पर विकता येऊ नये, यासाठी किमान ७ वर्षे ती पालिकेच्याच नावे राहणार आहे. त्यामुळे स्वखर्चातून मिळविलेल्या रिक्षामालकीपासून लाभार्थी महिलांना वंचित रहावे लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती शानू गोहिल यांनी सांगितले कि, लाभार्थी महिलांना रिक्षा खरेदीसाठी पालिकेकडुन अनुदान देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला आहे. परंतु, त्याचा आकडा अद्याप निश्चित झाला नसला तरी तो लवकरच जाहिर केला जाणार आहे. तसेच अर्जदार महिला दारिद्रय रेषेखालील तसेच किमान ८ वी पर्यंत शिक्षित व त्यांचे शहरात किमान १५ वर्षे वास्तव्य असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- महिला दिनी शहरातील महिला पोलिस नाईक वैष्णवी यंबर, डॉ. राखी अग्रवाल, जिविधा पटेल (तिरंदाज), निधी यादव (कोरीयन कराटेपटू), सुविधा अहिरराव (फूटबॉलपटू), सुविधा कदम (मार्शल आर्ट कराटेपटू), शोभा गांगण (कवयित्री), ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील, सहाय्यक आयुक्त मंजिरी डिमेलो, मोनिका संघवी (हॅन्डीक्राफ्ट) व पालिकेच्या वरीष्ठ सफाई कर्मचारी जमुना सोलंकी यांचा विशेष सत्कार सिने अभिनेत्री झीनत अमान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.