डोंबिवली - विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाची सांगड शालेय जीवनात घालता आली पाहिजे. समाजात वावरताना हुशारीने आणि प्रामाणिकपणे राहता आले पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेत वस्तू उत्पादक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय जीवनातच मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळायला हवा. व्यवहार ज्ञान जागृत व्हायला हवे. वस्तू अत्यंत आकर्षकपणे तयार करून त्यांची विक्री करता आली पाहिजे या उद्देशाने दिवाळी सणाचे औचित्य साधून शाळेत वस्तू उत्पादन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची संकल्पना सरिता काळे, स्मिता धबडे व सविता नवले या शिक्षकांची आहे.या उपक्रमासाठी बाजारातून मातीच्या वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या मुलांनी आणल्या. त्याला मणी, लेस असे विविध प्रकारचे साहित्य वापरून आकर्षक करण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी अत्यंत साध्या व सोप्या पध्दतीने रंगीबेरंगी आकाशकंदील बनविले. बाजारातून उटण्याचे साहित्य आणून सुंगधी उटणे तयार केले. रंगीत आकर्षक पणत्या, आकाशकंदील व सुगंधी उटणे मुलांनी बाजार लावला.या उपक्रमातून नवनिर्मिती, आकर्षकपणा तसेच व्यवहार ज्ञानाची जोड या उपक्रमातून घालण्याचा प्रयत्न केला. व्यवसाय सुरू करताना भागभांडवल गुंतवणूक करावी लागते. विक्री करताना नफा तसेच ग्राहकांचा आनंद व समाधान जपावे लागते याचा वस्तूपाठ यानिमित्ताने मुलांना मिळाल्याचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक कुसुम भंगाळे, वैशाली पेठे, शर्मिला गायकवाड, मंगला आंबेकर, स्मिता कांबळे, लतिका राऊत, मेघा पाटील, महेंद्र अढांगळे, सुभाष जनबंधु, हर्षद खंबायत यांनी मेहनत घेतली.