भिवंडी : भिवंडी पालिका क्षेत्रातील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही वाहनधारकांना खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही. २००६ मध्ये सुरू झालेला हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले; परंतु अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसून, या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेले खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेल्या खड्ड्यांमधून वाहन चालवणे मोठ्या जिकिरीचे ठरत आहे. तीन ते चार दिवस पडलेल्या पावसामुळे या खड्ड्यांचा जास्तच त्रास होत आहे. अशा परिस्थितीत या उड्डाणपुलाकडे व येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडे भिवंडी पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून येथे तात्पुरती डागडुजी करण्याचेही पालिका प्रयत्न करीत नसल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.