मुंब्रा : येथील बायपास रस्त्यावर दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्ती केलेल्या या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बायपास रस्त्याच्या ठाणे दिशेच्या मार्गिकेवरील रस्त्यावरचा एका ठिकाणचा काँक्रिटचा थर पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावर २५ ते ३० फूट खड्डा पडला आहे. यामुळे रस्त्यावरील सळ्या उघड्या पडल्या आहेत. या रस्त्याच्या खालून गेलेला राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता दिसत होता. बुधवारी मध्यरात्री उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून या रस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने होणारी अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या रस्त्याजवळील एका धाब्यासमोरून पनवेलच्या दिशेला रस्त्याच्या खालून गेलेल्या नाल्याच्या खालची माती वाहून गेली आहे. त्यामुळे तेथील कच्च्या रस्त्यावरही मोठा खड्डा पडला आहे. ही बाब गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या खड्ड्यामुळे दुर्घटना घडू नये, यासाठी ठामपाच्या आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून तेथे तात्पुरते बॅरिकेड्स लावले आहेत.
--------------