कल्याण : कल्याण-शीळ रस्त्यावरील काटई येथील जुन्या रेल्वे उड्डाणपुलावर पडलेले खड्डे अखेर भरण्यात आले आहेत. या पुलावरील खड्डे भरण्याचे काम शुक्रवार रात्रीपासून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्ते दुरुस्ती पथकाने हाती घेतले होते. ते शनिवारी दिवसभरात पूर्ण झाले आहे.
काटई जुना रेल्वे उड्डाणपूल हा रेल्वेच्या दिवा-पनवेल मार्गावर आहे. हा पूल जुना झाल्याने त्याची डागडुजी गेल्यावर्षीच करण्यात आली होती. परंतु, यंदा पावसाळ्यात या पुलावर खड्डे पडले होते. त्यामुळे या पुलाच्या आधी काटई टोलनाका आणि पुलाच्या पुढे पलावा जंक्शन येथे वाहतूक कोंडी होत होती. पुलावरील खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत होते. या पुलावरील खड्डे भरण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार त्यांनी पुलावरील खड्डे भरण्यास शुक्रवारी रात्री सुरुवात झाली.
---------------------