लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण झालेल्या कोपर रेल्वे उड्डाणपुलावर अवघ्या दोनच दिवसांत खड्डे पडले आहेत. अवघ्या ४८ तासांत नव्या पुलाच्या निकृष्टतेचे पितळ उघडे पडल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापले आहे. खड्डे पडल्याचे कळताच मनसे आमदार राजू पाटील यांनी पुलाची पाहणी केली, तर प्रशासनाने खड्डे बुजवून आपली अब्रू झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून मनसे आणि शिवसेनेत जुंपली आहे.कोपर पुलाचे काम कमी वेळेत पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला होता. त्याचे ऑनलाइन लोकार्पण दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस उलटत नाही तोच त्यावर खड्डे पडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार कळताच पुलाच्या पाहणीसाठी मनसे आमदार पाटील यांनी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, पुलाचे काम वेळेत पूर्ण करा, अशी आमची मागणी होती. गणेश चतुर्थी आधी तो खुला केला.
प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले की, पुलावरील मास्टेक कामाचा एक कोट बाकी आहे. पावसाची उसंत मिळताच काम केले जाईल. खड्डे बुजविण्यात प्रशासनाने जी तत्परता दाखविली आहे तीच तत्परता शहरातील अन्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या बाबतीत दाखवावी. खड्डे बुजविण्यासाठी १७ कोटींचे जे टेंडर काढले आहे त्याची पूर्तता करावी, असा टोला पाटील यांनी प्रशासनासह शिवसेनेला लगावला. पाटील यांच्या टीकेनंतर शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, पुलाचे लोकार्पण केले. कोकण रिजनमध्ये जास्त पाऊस पडणार असा इशारा हवामान खात्याने दिला होता. पावसामुळे पुलाच्या एक्सपान्शन जॉइंटवरील डांबर निघाले आहे. तो काही खड्डा नाही. मात्र, चांगले काम होत असले तर त्या कामाला गालबोट लावायचे कसे काही पक्षाची मंडळींचे काम आहे. ती विधायक कामे करू शकत नाहीत. केवळ पाहणी करू शकतात. त्यांनीच पाहणी करावी. आम्ही विकासकामे करू, असा प्रतिटोला म्हात्रे यांनी लगावला. यामुळे राजकारण चांगलेच तापू लागले आहे.
नेटकऱ्यांची केडीएमसीवर टीकाडोंबिवली : कोपर उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या दोन दिवसांतच गुरुवारी या पुलावर पहिला खड्डा पडल्याचे निदर्शनास आले. या खड्ड्याचे फोटो, व्हिडीओ नागरिकांनी समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल करत केडीएमसीला ट्रोल केले. अनेकांनी उपाहासाने महापालिकेचे अभिनंदन करून पहिला खड्डा पडला, असे म्हणत जोरदार टीका केली. त्याची दखल घेत महापालिकेचे अधिकारी पुलावर गेले आणि अवघ्या काही तासांतच त्यांनी तात्पुरता खड्डा बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.