कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागते असून, त्यामुळे पुलावर वाहतूककोंडी होत आहे.
कल्याण-मुरबाड मार्ग पुढे माळशेज घाटमार्गे नगरकडे जातो. त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाणपूल हा महत्त्वाचा आहे. या पुलावर पावसाळ्यात खड्डे पडले आहे. पुलावर दोरखंडाने दुभाजक म्हणून लावलेले लोखंडी पिंप अस्ताव्यस्त झाले आहेत. पुलावरील गर्डर बाहेर आलेले आहेत. खड्डे आणि गर्डरचे झटके खात वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ-सायंकाळ वाहनचालकांना पुलावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. पुलाला पत्र्याचे संरक्षण कडे असले तरी पुला खालून कल्याण-कसारा रेल्वे मार्ग गेला आहे. रेल्वे मार्गावर अति उच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत. त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता लक्षात घेऊन पुलावरील खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचेही या पुलावरील खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
कल्याण-मुरबाड-नगर रस्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. त्याचबरोबर शहाड पुलाचे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडला आहे. सध्या मुरबाडच्या दिशेने पुलापासून ते सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या शाळेपर्यंत काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कल्याणच्या दिशेने शहाड पुलावरून वालधुनी नदीवरील पुलाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. दोन्ही बाजूला रस्ता सुसज्ज आणि प्रशस्त झालेला असता पुलावरील खड्ड्याचा त्रास वाहनचालकांसह रिक्षा, बस, दुचाकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.
------------