कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत या कामावर त्यातील ७० टक्के रक्कम खर्च झाली आहे. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम असल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौरांनी त्यावर खुलासा करीत मनसेची सभा तहकुबीची सूचना फेटाळून लावल्याने त्याला मनसेने जोरदार हरकत घेतली. ही सभा राज्य सरकारच्या निषेधार्थ तहकूब करा, अशी मागणी केली. त्याचबरोबर भाजप गटनेत्यानेही सभा तहकुबीची मागणी उचलून धरल्याने अखेरीस खड्डे बुजविण्याच्या मागणीवर महापौरांना पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली.मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी खड्डे बुजविले गेले नसल्याच्या मुद्यावर सभा तहकुबीची सूचना मांडली होती. भोईर म्हणाले की, महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा खर्च कमी झाला पाहिजे होता. मात्र, तो मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे.मागच्या वर्षी १३ कोटी रुपये खड्डे बुजविण्यावर खर्च केले गेले आहेत. यंदाच्या वर्षी १७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १२ कोटी खर्च झाले असून, पाच हजार ८२३ खड्डे बुजविल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. राज्य सरकारकडून महापालिकेस निधी मिळत नसल्याने सरकारच्या विरोधात ही सभा तहकूब करा, अशी मागणी भोईर यांनी केली. हीच मागणी मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी उचलून धरली.भाजपच्या नगरसेविका सुनीता पाटील म्हणाल्या, माझ्या प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी २३ गाड्या खडी-डांबरच्या रित्या केल्या असल्याची माहिती अधिकारी देत आहेत. असे असतानाही प्रभागातील खड्डे बुजले का गेले नाहीत, असा सवाल त्यांनी केला.भाजप नगरसेविका प्रमिला चौधरी म्हणाल्या, ‘माझ्या ठाकुर्ली-चोळेगावातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र, प्रशासनाचे तेथे काडीमात्र लक्ष नाही.’ त्यावर महापालिका प्रशासनाने जबाब द्यावा, अशी आग्रही मागणी भाजपचे नगरसेवक राजन सामंत यांनी केली.महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली म्हणाल्या की, यंदा सगळ्यात जास्त पाऊस पडला. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली. रस्त्याच्या दुतर्फा गटारे आणि ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने केवळ खड्डा न बुजविता रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करावे लागते. २७ गावांतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. तेथील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ३२७ कोटी रुपये निधी मिळावा, असा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. मात्र, सरकारने अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. ती मिळणे अपेक्षित आहे. शहरातील सगळ्याच ठिकाणचे खड्डे बुजविले, असे म्हणता येत नाही. अजूनही काही रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.>सरकारच्या निषेधार्थ सभा तहकुबीची मागणीसरकार निधी देत नसल्याने सभा सरकारच्या निधेषार्थ तहकूब करा, अशी मागणी भोईर यांनी केली. त्यावर महापौरांनी खड्डे त्वरित बुजवावेत, असे आदेश प्रशासनाला दिले.तसेच भोईर यांनी मांडलेली सभा तहकुबी फेटाळल्याचे सांगितले. त्याला भोईर व हळबे यांनी जोरदार हरकत घेतली. या दोघांची मागणी उचलून धरत भाजप गटनेते विकास म्हात्रे यांनी, खड्डे बुजविले न गेल्याने सभा तहकूब करा, अशी मागणी केली.सभा तहकुबी फेटाळली ते योग्य नाही. त्यासाठी हा विषय मताला टाका, अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी म्हात्रे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस महापौरांनी पाच मिनिटांसाठी सभा तहकूब केली.
रस्त्यांवर अजूनही खड्डे कायम, केडीएमसी प्रशासनाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 1:39 AM