मीरा रोड : ठाणे लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्यासाठी आमदार नरेंद्र मेहतांच्या शाळेत आयोजित केलेल्या सेना-भाजप-आरपीआय आठवले गटाच्या मनोमिलन मेळाव्यामध्ये मंत्री, आमदार, नगरसेवक व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मांदियाळीत छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र शेवटच्या रांगेत कोपऱ्यातले स्थान देण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागणाऱ्या युतीकडून त्यांचा सन्मान मात्र राखला जात नसल्याबद्दल टीकेची झोड उठू लागली आहे.
शनिवारी रात्री सेव्हन स्क्वेअर शाळेच्या मैदानात आयोजित या मेळाव्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, युतीचे उमेदवार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक व नरेंद्र मेहता, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा, महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती रवी व्यास, सेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, आरपीआयचे देवेंद्र शेलेकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आ. मेहता व आ. सरनाईक यांनी मंचावर सेल्फी घेतला. राज्यात युतीचे ४३ ते ४५ खासदार निवडून येतील. मेहता जे बोलतात, ते करून दाखवतात, असे पालकमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी मीरा-भार्इंदरमधून संपली असून, आता काँग्रेसही संपवून टाकू, असे आ. मेहता म्हणाले. मुझफ्फर हुसेन यांनी शहरातील राजकारणातून नाईक यांना संपवले. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी संपली, असा मित्र असेल तर विरोधकांची गरजच नाही, असा टोला त्यांनी लगावला.