नितीन पंडितभिवंडी - वळपाडा येथील वर्धमान कंपाउंडमधील तीन मजली इमारत कोसळण्याची दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी १५ हून अधिकजण अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच अत्यंत कमकुवत बांधकाम असलेल्या या इमारतीवर मोबाइल टॉवर उभारला होता. त्याचे वजन असह्य होऊन ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या इमारतीचा तळमजला व पहिल्या मजल्यावर एका कंपनीचे गोडाऊन होते, तर दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर निवासी खोल्या बांधण्यात आल्या होत्या. त्यामध्ये भाडेकरूंचे वास्तव्य होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका व पोलिस यंत्रणा दाखल झाली व त्यांनी बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर ठाणे येथील टीडीआरएफचे पथक दाखल झाले व बचाव कार्याला गती मिळाली. अपघातानंतर भिवंडीत झालेल्या अभूतपूर्व वाहतूककोंडीमुळे एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचायला एक ते दीड तास उशीर झाला.
मृतांची नावेनवनाथ सावंत (३५), लक्ष्मी रवी महतो (३२), सोना मुकेश कोरी (साडेचार वर्षे)
जखमींची नावेसोनाली परमेश्वर कांबळे (२२), शिवकुमार परमेश्वर कांबळे (अडीच वर्षे), मुख्तार रोशन मंसुरी (२६), चिंकू रवी महतो (३), प्रिन्स रवी महतो (५), विकासकुमार मुकेश रावल (१८), उदयभान मुनीराम यादव (२९), अनिता (३०), उज्ज्वला कांबळे (३०)
मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीरभिवंडी येथे शनिवारी दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
बिल्डरला अटकबिल्डर इंद्रपाल रघुनाथ पाटील याच्याविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करत त्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली आहे. इमारतीवरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. तेथे २७ ते ३० खोल्या बांधण्यात आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या कमकुवत इमारतीवर मोबाइल टॉवर उभारण्यात आला होता. टॉवरचा इमारतीवर अतिरिक्त भार पडला व ही दुर्घटना घडली, असा आजूबाजूच्या रहिवाशांचा अंदाज आहे.
सुदैवाने वाचलेतळमजला व पहिल्या मजल्यावर एम. आर. के. फूड्स या कंपनीचे गोदाम आहे. कंपनीमध्ये सुमारे ५५ कामगार कामावर होते. मात्र, दुर्घटना घडली तेव्हा जेवणाची वेळ असल्याने ते बाहेर हाेते असा अंदाज आहे. दुर्घटनेनंतर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तहसीलदार अधिक पाटील, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, उपविभागीय आयुक्त अमित सानप आदींनी घटनास्थळी भेट दिली.