ठाणे : सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये जून अखेर पर्यंत पुरेल इतका पाणी साठ आहे. त्यामुळे कोणतीही पाणी कपात होणार नाही. मात्र, पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी टँकरची व्यवस्था तयार ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
यंदाच्या वर्षी पाऊस लांबला असल्याने जिल्ह्यातील जल साठ्यांच्या स्थितीची माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. यावेळी जिल्ह्यात जून अखेर पर्यंत पाणी साठ पुरेल इतका आहे. त्यात पाऊस लांबल्यास पाण्याची स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची परस्थिती निर्माण झाल्यास जिल्हातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पर्यायी टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व महापलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले.
वादळ, अतिवृष्टी झाली, दरड कोसळल्या नंतर लगेचच तेथील परस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करणे या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस यंत्रणा सतर्क राहण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. महिला बचत गटांच्या संख्या वाढविणे महिला बचत गट प्रक्रियेमध्ये ज्या महिला अद्याप आलेल्या नाहीत, अशा महिलांना त्याच्यासाठी प्रोत्साहित करून वेगवेगळी उपक्रम राबविणे, त्यात महिला बचत गटाचे सहकार्य वाढवणे ते काम महापालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र करण्याचे नियोजन करावे असे देखील देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील खर्चाचे नियोजन या ठिकाणी केले आहे. वेळोवेळी कामांचा व खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे, इथून पुढे सुद्धा ज्या वेळेला आवश्यकता वाटेल तेव्हा आढावा घेऊन जिल्हा नियोजनचा सगळा १०० टक्के वेळेत कसा खर्च होईल, कामे वेळेत कशी सुरु होतील ? वेळेत कशी पूर्ण होतील, दर्जेदार कशी होतील या सगळ्या गोष्टींकडे पालकमंत्री म्हणून माझे लक्ष असणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मी हरवलो नाही...पालकमंत्री हरवले असल्याचे फलक जिल्ह्यातील काही ठिकाणी लावण्यात आल्याच्या मुद्यावर त्यांना छेडले असता, मी कुठे हरवलो आहे, हरवलो असतो तर दिसलो नसतो, मी तर तुमच्या समोरच असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्यात सरकार पडले राऊतांच्या या वक्तव्यावर संजय राऊत चुकीच्या चिठ्या काढतात, त्यामुळे महाविकास आघाडीने आता पोपट बदलायला हवा असा सल्लाही त्यांनी दिला. शेखर बागडे बाबत विरोधी पक्षनेत्यांचे जे काही म्हणने असेल ते त्यांनी द्यावे त्यावर सरकार निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले.