भिवंडी : मुलीने बीएस्सी आयटी शाखेत ९१ टक्के मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. मुलीच्या या यशाचे कौतुक तिच्या पालकांनी अनोख्या पद्धतीने करत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. तरुणतरुणींमध्ये निसर्ग आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून ९१ झाडे लावून मुलीचे यश साजरे केले.
भिवंडीतील महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालयातील प्रियंका अनिल पाटील या विद्यार्थिनीने बीएस्सी आयटी परीक्षेत ९१.१० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्र मांक मिळवला. डुंगेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या प्रियंकाने बीएस्सी आयटी परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबाबत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. मुलीच्या यशाच्या स्मृती जपण्यासाठी तसेच तिच्यापासून इतर विद्यार्थ्यांनीही दखल घ्यावी, यासाठी प्रियंका हिच्या पालकांनी वृक्षारोपण करत निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला. तालुक्यातील डुंगे, वडघर, वडूनवघर, कालवार व कारिवली या पाच गावांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पाचगाव कालवार येथील शांतता मंडळ हॉल परिसरात ९१ वृक्षांची लागवड केली.प्रियंकाचे वडील डुंगे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. त्यांच्या मित्रपरिवाराने एकत्र येत ही वृक्षलागवड केली. या वृक्षलागवड प्रसंगी कालवार गावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास म्हात्रे, कालवारचे सरपंच देवानंद पाटील, वडघरचे माजी सरपंच अरु ण पंडित, डुंगेगावचे माजी सरपंच रामनाथ पाटील, समाजसेवक किशोर जाधव यांच्यासह ९१ टक्के गुण प्राप्त करणारी विद्यार्थिनी प्रियंका आणि तिचे वडील अनिल पाटील उपस्थित होते.