बदलापूर : गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणासाठी वृक्षांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्था विविध माध्यमांतून पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापुरातील माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनीही वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण केले. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा,’ असा संदेश देत पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
वटपौर्णिमेचे औचित्य साधून कात्रप भागातील उद्यानात वृक्षारोपण केले. सामान्यतः वटपौर्णिमेला वडाचे पूजन करून महिला वडाला प्रदक्षिणा घालतात. शहरी भागात जवळपास वडाचे झाड नसल्यास बाजारातून वडाच्या फांद्या आणून त्यांचे पूजन केले जाते. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात वडाच्या फांद्या तोडल्या जातात. त्यामध्ये झाडांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्याचा उपक्रम सुरू केला. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा करण्यापेक्षा आपण ही परंपरा अधिक चांगल्या प्रकारे जतन करू शकतो, असे सांगून सर्वांनीच अशाप्रकारे वटपौर्णिमा साजरी करून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन संभाजी शिंदे यांनी केले.