कळंबोली : कळंबोली वसाहतीतील शिवसेना शाखेजवळील झाडे पनवेल महापालिकेने मागील आठवड्यात तोडली. मात्र तोडलेल्या झाडाचे खोड पदपथावर टाकण्यात आले असून साले, पालापाचोळा रस्त्यावर काही दिवसांपासून पडून आहे.पनवेल-सायन महामार्गालगत कळंबोलीच्या प्रवेशद्वारावर सेक्टर १ ई मधील एका सोसायटीत महापालिकेच्या परवानगीनुसार जाहिरातीसाठी मोठे होर्र्डिंग उभारण्यात आहे होते. महामार्गावरून जाताना आणि येताना ते दिसत नसल्याने अडसर ठरणाºया झाडांना खिळे ठोकून त्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यांची शहानिशा करण्याचे पत्र कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांच्याकडून महापालिकेला देण्यात आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही फलक हटवण्याची मागणी केली होती.कळंबोली वसाहतीतील इतर धोकादायक झाडे तोडायचे सोडून मनपाने विषप्रयोग झालेली झाडे शुक्रवारी तोडले. मात्र तोडलेले खोड बाजूच्या पदपथावर टाकले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याशिवाय रस्त्यावरच पालापाचोळा तसेच खोडाची साल पडल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या संदर्भात महापालिकेच्या सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.कळंबोलीतील झाडांचा विषय महासभेतकळंबोलीतील झाडांना विष देऊन मारण्यात आल्याच्या तक्रारी येऊनही याबाबत महापालिकेने काही केले नाही. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी होर्डिंगचा परवानाच रद्द करण्याची मागणी केली. तर नगरसेवक अमर पाटील यांनी या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली. लवकरच योग्य चौकशी केली जाईल, असे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.महापालिकेचा हलगर्जीपणा : जाहिरातीचे होर्डिंग्ज दिसण्यास अडथळा येत असल्याने वृक्ष प्राधिकरण विभागाने विषप्रयोग झालेली झाडे तोडली. त्याचबरोबर महामार्ग आणि सर्व्हिस रोडच्या मध्यभागी असलेले एक झाड सुद्धा मनपाने छाटले आहे. झाडे तोडण्यात महापालिकेने तत्परता दाखवली. यावरून त्या खाजगी कंपनीच्या फायद्यासाठीच झाडांचा बळी दिलाचा आरोप कळंबोली येथील रहिवासी प्रल्हाद कुंभार यांनी केला आहे.
कळंबोलीत तोडलेली झाडे रस्त्यावर पडून; पादचाऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:34 PM