ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांवर आवश्यकतेनुसार उपचार करण्यासाठी शहरात प्लाझ्मा केंद्र उभारण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत तावडे यांनी ठामपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. शर्मा यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शहरात लवकरच प्लाझ्मा केंद्र सुरूकरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तसेच जिल्ह्यामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिका आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वैद्यकीय पथकांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे मृत्युदर रोखण्यासाठीही उपाययोजना सुरू आहेत. काही प्रतिबंधात्मक इंजेक्शनचा वापर करून त्याचा मुकाबला करण्यात येत आहे . मात्र, ठाणे जिल्ह्याचे स्वत:चे प्लाझ्मा केंद्र तातडीने सुरू करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे गरीब गरजू रु ग्णांना नि:शुल्क तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम रु ग्णांना वाजवी दरामध्ये प्लाझ्मा उपलब्ध होऊ शकेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आणि ठाणे महानगरपालिकेने स्वत:चे प्लाझ्मा केंद्र ठाण्यात सुरू करावे, अशी मागणी तावडे यांनी पालिका आयुक्त डॉ. शर्मा तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.