डोंबिवली : येथील पूर्वेकडील रामचंद्र टॉकीजजवळ असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जलकुंभाजवळ राहणाऱ्या व्हॉल्व्हमनच्या घराच्या छताचे प्लास्टर कोसळून तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुनील घाणे, त्यांची पत्नी उज्ज्वला आणि मुलगी नम्रता अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. व्हॉल्व्हमनला राहण्यासाठी जलकुंभाच्या परिसरात घर देण्यात आले आहे. १९८७-८८ मधील बांधकाम असलेली ही चार घरे डागडुजीअभावी धोकादायक झाली आहेत. मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास हे सर्व झोपलेले असताना त्यांच्या अंगावर प्लास्टर कोसळले. महापालिकेकडून वारंवार या घरांची पाहणी करण्यात आली आहे. परंतु, दुरुस्ती अथवा नूतनीकरणासंदर्भात कोणतीही पावले आजवर उचलली गेलेली नाहीत. एकीकडे धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांना घरे रिकामी करण्यासंदर्भात पालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात. परंतु, स्वत:च्याच वास्तू या अतिधोकादायक बनल्या आहेत, याकडे मात्र प्रशासनाचा पुरता कानाडोळा झाला आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही घरे राहण्यायोग्य नसल्याने तेथे राहणाऱ्यांना घरे रिकामी करण्यास या आधीच सांगण्यात आले असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
प्लास्टर कोसळून तिघे जखमी
By admin | Published: October 10, 2016 3:25 AM