कल्याण : कोकण पदवधीर मतदारसंघाची निवडणूक आणि दिवसभर असलेली पावसाची संततधार, यात यंत्रणा गुंतून पडल्यामुळे मागील दोन दिवस झालेल्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला सोमवारी जिल्ह्यात काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. केवळ केडीएमसीने दिवसभरात सात विक्रेत्यांवर बडगा उगारत त्यांच्याकडून १७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.राज्य सरकारने शनिवारपासून लागू केलेल्या प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करताना केडीएमसीने पहिल्याच दिवशी ५० हजार रु पयांचा दंड वसूल केला होता. शहरातील फेरीवाले, दुकानदारांवर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी १० जणांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. रविवार सुट्टीच्या दिवशी एकही दंडात्मक कारवाई झाली नाही. मात्र, ऊर्जा फाउंडेशनने राबवलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या संकलन उपक्रमात डोंबिवलीत दोन आाणि कल्याणमध्ये एक असा तीन टन प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. दंडात्मक कारवाईच्या भीतीमुळे प्लास्टिक संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.केडीएमसीने कल्याणमधील आधारवाडी अग्निशमन दलाशेजारी, सुभाष मैदान, बेतुरकरपाडा स्वानंदनगर मैदान, दत्तआळी ओक हायस्कूल, पारनाका श्रीराम भुवन, डोंबिवलीतील महात्मा गांधी रोडवरील समतोल इको वर्क्स, हळबे व्यायामशाळा, कोपर रोड मल उदंचन केंद्र, सोनारपाडामधील मातोश्री ट्रस्ट आदी नऊ ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचे संकलन केंद्र उभारली आहेत. नागरिकांनी आपल्या जवळील प्लास्टिकच्या पिशव्या तेथे जमा कराव्यात, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी केले आहे.
Plastic Ban : प्लास्टिकबंदीच्या कारवाईला पावसाचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:34 AM