कल्याण : पर्यावरण संतुलन राखण्याच्या अनुषंगाने कल्याणजवळील वरप येथे पार पडलेल्या वृक्षलागवडीच्या महामोहीम कार्यक्रमाच्या सभामंडपातच प्लास्टिकच्या ग्लासांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर झाल्याने प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने झाल्याचे पाहावयास मिळाले.१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेच्या राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी कल्याणजवळील वरप येथील राधास्वामी सत्संग आश्रमामागील वनविभागाच्या जागेवर पार पडला. हा कार्यक्रम राज्य सरकारचा तसेच मोहिमेच्या उद्घाटनाचा असल्याने कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार आदींनी आवर्जून उपस्थिती लावली होती. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर उभारण्यात आलेल्या सभामंडपात मान्यवरांची भाषणे झाली. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्याची बाटलीही या मंडपात नेण्यास मज्जाव केला जात होता. परंतु, ज्याठिकाणी पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तेथे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासचा सर्रासपणे वापर सुरू होता. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच प्लास्टिकबंदी धाब्यावर बसवली गेल्याचे दिसून आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नागपूरला जायचे आहे, असे सांगून १० मिनिटांचे भाषण करून ते निघाले. अन्य मान्यवरांची भाषणे झाली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी सभामंडप सोडल्यानंतर काहींनी काढता पाय घेतल्याने मागील खुर्च्या रिकाम्या झाल्या.२० मिनिटांसाठी विद्यार्थी ताटकळले दोन तासवृक्षलागवडीच्या महामोहिमेचा कार्यक्रम अवघ्या १५ ते २० मिनिटांत पार पडला; मात्र त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत उभे राहावे लागल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते.कार्यक्रम सकाळी ११ चा होता, परंतु सकाळी ९ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी तिष्ठत ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी ११.१५ च्या आसपास घटनास्थळी आगमन झाले.लागलीच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. साधारण २० मिनिटांमध्ये हा मुख्य कार्यक्रम उरकण्यात आला. परंतु, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना दोन तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले.ऐकलीचनाही कैफियतयेथील रहिवासी असलेल्या आदिवासी-कातकरी समाजाच्या हक्काच्या जमिनीवरील वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने संबंधित समाजबांधव मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडणार होते; परंतु अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी भेट नाकारल्याचे समजते.
प्लास्टिकबंदीची ऐशीतैशी! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ग्लासचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:46 AM