डोंबिवली : राज्यात प्लास्टिकबंदी असतानाही शहरातील व्यापारी, फेरीवाले यांच्याकडे सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. मात्र, शहरात बाहेरून येणारे फेरीवाले प्लास्टिकचा वापर जास्त करत असल्याचा अजब दावा महापालिकेचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी केला.
शहरातील फडके रोड, डॉ. राथ रोड, चिमणी गल्ली, मानपाडा रस्ता, नेहरू मैदान परिसर, ठाकुर्ली रेल्वेस्थानक ते हनुमान मंदिर परिसर, पश्चिमेला गुप्ते रोड, मच्छीमार्केट परिसर, फुले रस्ता, गोपी टॉकीज परिसर, जयहिंद कॉलनी परिसर, उमेश नगर, गरिबाचा वाडा आदी परिसरात बसणाºया फेरीवाल्यांकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत.
महापालिका आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यंतरी प्लास्टिक बंदीविरोधात कडक मोहीम राबवली होती. त्यामुळे त्यावेळी कचरा गोळा करून तो डम्पिंगवर टाकताना अथवा बायोगॅसमध्ये कचºयाचे वर्गीकरण करताना एकूण सुमारे ३५० टन निर्माण होणाºया कचºयामध्ये सुमारे २० टन प्लास्टिकच्या कचºयाची घट झाली होती. त्यामुळे शहरात सर्वत्र प्लास्टिकबंदीचा प्रभाव दिसून यायला लागला होता. नागरिकही स्वत:हून कापडी पिशव्या वापरण्याच्या मानसिकतेत होते. परंतु, मार्च, एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून आतापर्यंत प्लास्टिकबंदी विरोधात ठोस अशी कारवाई झाली नाही.
दिवाळीपासून पुन्हा सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे कारवाईत सातत्य नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तर, पर्यावरण अभ्यासक, महापालिकेचे अधिकारी यांनी राज्य सरकारने प्लास्टिकचे कारखान्यांमधील उत्पादन बंद करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापालिकेच्या पथकाकडून सकाळी, दुपारी व सायंकाळी नियमबाह्य प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जाते. परंतु, कारवाई पथकाची पाठ फिरताच पुन्हा रात्री उशिरापर्यंत प्लास्टिक पिशव्यांचे वितरण केले जाते. त्यामुळे समस्या सुटत नसल्याची महापालिकेने नाराजी व्यक्त केली.
शहरात बाहेरून येणारे प्लास्टिक, पिशव्या कसे रोखावे, हा मोठा पेच आहे. पण त्यावरही अल्पावधीतच आम्ही नियंत्रण मिळवू. प्लास्टिक बंदीवरील कारवाईत सातत्य राहणार असून, त्यासंदर्भातील सूचना संबंधित स्वच्छता निरीक्षक, प्रभागक्षेत्र अधिकारी, मुकादम आदींना देण्यात आल्या आहेत. संकलित झालेले प्लास्टिक गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.- उमाकांत गायकवाड, उपायुक्त, घनकचरा विभाग.
प्लास्टिक घेऊ येणारे बाहरेचे असोत की आतले, ही जबाबदारी अधिकाºयांची आहे. कारवाईत कामचुकारपणा नको. दोन दिवसांनी प्लास्टिकबंदीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहे. त्यात दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. थातुरमातूर कारवाईला अर्थच नाही.- विनीता राणे, महापौर, कल्याण-डोंबिवली