सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील शिधावाटप दुकानातून देण्यात येणारा तांदूळ प्लास्टिक सदृश असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यावर, एकच खळबळ उडाली आहे. शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर यांनी मात्र केंद्र शासनाकडून देण्यात येणारा तांदूळ हा पोषकयुक्त असल्याची माहिती दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, नागराणी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने शिधावाटप दुकानातून आणलेल्या तांदुळात काही तांदूळ जाड असल्याचे लक्षात आले. जाड तांदूळ बाजूला करून पाण्यात टाकले असता, तांदूळ पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. तसेच तांदुळाची चव वेगळी लागत असल्याचा आरोप महिलेने केला. या महिले प्रमाणेच इतर महिलांनीही या सुरात तक्रारी सुरू केल्यावर, प्लास्टिक तांदुळाची अफवा शहरात पसरली आहे. याबाबत शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्लास्टिक सदृश तांदुळाच्या तक्रारी कार्यालयात आल्याची कबुली दिली. मात्र हा तांदूळ केंद्राकडून आला असून मुलांचे कुपोषण होऊ नये, म्हणून पोषक पूरक तांदळाचा पुरवठा केंद्राने केल्याची माहिती ज्योती तांबेकर यांनी दिली आहे.
शहरातील शिधावाटप दुकानदारांनी जाडा व पाण्यात तरंगणाऱ्या तांदुळाबाबत नागरिकांना महिती द्या. असे आवाहन शिधावाटप अधिकारी तांबेकर यांनी केले. मात्र हा तांदूळ खालल्याने, तब्येती बिघडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. एकूणच शहरातील नागरिकांनी या प्लास्टिक सदृश्य तांदळाचा धसका घेतला असून यापूर्वीचा तांदूळ दुकानातून द्या. अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. तसेच या तांदुळाची तपासणी करावी. असेही नागरिकांचे म्हणणे आहे