कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या रविवारी प्लास्टिक व जुने कपडे संकलन मोहीम राबविली जात आहे; परंतु सध्या ही मोहीम प्रतिसादाअभावी थंडावल्याचे चित्र डोंबिवलीत पाहायला मिळत आहे.
केडीएमसीतर्फे ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. नागरिकांकडून सुक्या कचऱ्यात कापड, प्लास्टिक, फर्निचर, काच एकत्रित दिले जाते. त्यामुळे या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष मोहीम सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मनपाने हाती घेतली आहे. महिन्याचा पहिल्या रविवारी ई-कचरा, दुसऱ्या रविवारी प्लास्टिक आणि जुने कपडे, तिसऱ्या रविवारी काच, तर चौथा रविवार फर्निचर संकलनासाठी ठरविण्यात आला आहे.
डिसेंबर २०२० मध्ये सुरू झालेली ही मोहीम कल्याण-डोंबिवलीतील आठ केंद्रांवर चालू करण्यात आली. दर, रविवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान राबविल्या जात असलेल्या मोहिमेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. जमा झालेल्या कपड्यापासून कापडी पिशव्या तयार करण्याचे आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे मनपाचे नियोजन होते; परंतु सध्या या मोहिमेला प्रतिसाद लाभत नसल्याने सामाजिक संघटनाही चिंतेत पडल्या आहेत.
दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, लाकडी सामान दिसून येते; परंतु तो कचरा संकलन करून केंद्रावर आणून देण्याची मानसिकता नागरिकांमध्ये राहिली नाही की, याचा प्रचार आणि प्रसार करण्यात मनपा कुठेतरी कमी पडतेय? असा सवाल निर्माण झाला आहे. यासंदर्भात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
‘माणुसकीची भिंत’ हटविली
गरीब आणि गरजूंसाठी मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात माणुसकीची भिंत उपक्रम जानेवारीमध्ये तत्कालीन ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला होता; परंतु हा उपक्रम उघड्यावर राबविला गेल्याने पावसात ही ‘माणुसकीची भिंत’ भिजली आणि कपडे भिजून त्याला कुबट वास येऊ लागला. यानंतरही त्या भिंतीला पावसाचा त्रास कसा होणार नाही, याकडे कानाडोळा झाल्याने ही भिंत तेथून हटविण्यात आली आहे. त्यामुळे हा उपक्रम बारगळल्याचे चित्र आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने लावलेल्या फलकासमोर आता दुचाकी उभ्या केल्या जात आहेत.
-------------------------