ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा खच होत असताना दुसरीकडे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वे प्रशासनांकडे कोणतीही यंत्रणा नव्हती. मात्र, आता येथे अत्याधुनिक पेट बॉटल रिसायकल मशीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे या मशीनमध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या टाकताच काही क्षणात रिसायकलिंग होऊन त्यांची विल्हेवाट लागेल. ही मशीन सद्यस्थितीत स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे बसवण्यात आली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) लोकल, तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अप-डाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये जा करतात. स्थानकात १० फलाटांवर एकूण १६ उपाहारगृहे आहेत. याच उपाहारगृहांतून उन्हाळा सुरू झाल्याने आणि लिंबू सरबत मिळणे बंद झाल्याने दररोज एक लीटरच्या १२ बाटल्या असलेले ५०० बॉक्स म्हणजे ६००० लीटर पाणी दिवसाला विक्री होते. एका महिन्याचा विचार केल्यास सुमारे दोन लाखांच्या आसपास लीटर पाणी विक्री होते.मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळा आणि हिवाळ्यात हे प्रमाण निम्मे असते,असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात येते. फलाट क्रमांक ७ वरून मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून रिकाम्या बाटल्या जास्त प्रमाणात फलाट आणि रेल्वे रुळांवर फेकल्या जातात. त्या कचऱ्यांमध्ये जमा होतात. या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच मार्श अॅण्ड मॅकलिन कंपनीचे ही मशीन रोटरी क्लबच्या पुढाकाराने बसवण्यात आली आहे. ती कशी हाताळायची याबाबत सूचनादेखील प्रवाशांना दिल्या जातात. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर यानिमित्ताने होणार आहे.या मशीनची क्षमता १५ किलो एवढी असून संबंधित कंपनीचे कर्मचारी हे प्लास्टिक कंपनीमध्ये पुढील प्रक्रियेसाठी घेऊन जाणार आहेत. या मशीनचा जास्तीत जास्त प्रवाशांनी वापर करावा, असे आवाहन फलाटांवर फलक लावून केले जाणार आहे. तसेच ठाणे स्थानक नो-प्लॉस्टिक झोन करण्याचा निर्धार यानिमित्त केला जाणार असल्याचा ठाणे रेल्वे प्रबंधक आर.के. मीना यांनी केला.