ठाणे - दिवसेंदिवस वाढत चाललेला प्लास्टिकचा वापर हा पर्यावरणास हानीकारक आहे हे मानवाला माहीत असूनही याकडे दुर्लक्ष करुनही हा मानव प्लास्टिक युगात जगत आहे. त्यामुळे चक्क प्लास्टिकच ठाण्यात बोलू लागला आहे. "तुम्ही मला संपवा नाहीतर एक दिवस मी तुम्हाला संपवणारच... तुमचा प्लास्टिक" हा इशारा प्लास्टिक देत आहे. ठाण्यात रविवारी अनोखा उपक्रम राबविला असून यातून प्लास्टिकचा झाडांना विळखा घालून त्या कलाकृतीतून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे.
इंडीयन स्वच्छता लीग या देशभरातील शहरांच्या स्पर्धेत ठाणे शहराची ठाणे टायगर्स ही टीम महापालिका पातळीवर सामील आहे. याचा एक भाग म्हणून टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून काही प्रतिकृती बनू शकते का या विचारातून सुरुवात होऊन प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिचा दुष्परीणाम लोकांना समजावा म्हणून बाटल्यांपासून कोणतेही सुंदर प्राणी पक्षी असे काही न बनवता झाडांना प्लास्टिकचा विळखा असे प्रतिकात्मक इंस्टॉलेशन बनविण्याची संकल्पना स्वत्वचे कलाकार नितांत हिर्लेकर यांनी मांडली. सुमारे दहा हजार टाकाऊ पेट बाटल्यांची यासाठी गरज होती.
महापालिका आणि परिसर भगिनी विकास संघ (स्त्री मुक्ती संघटना) यांच्या मदतीने बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली. संकलित झालेल्याबाटल्यांमधून चांगल्या बाटल्या काढणे आणि त्यांचे आकाराप्रमाणे वर्गीकरण करणे हे मोठे काम होते. भगिनी विकास संघामार्फत कचरावेचक महिलांची शालेय व महाविद्यालयीन मुले मुली या कामासाठी मदतीला आली. आठ दिवस वर्गीकरण, बाटल्या एकमेकांना जोडणे ही कामे वर्तकनगर येथील महिला बचतगट भवन येथे केली. सर्व बाटल्या जोडल्या तेव्हा त्याची अर्धा कि.मी. लांबी भरली. दोन दिवसात यांचे पाचपाखाडी येथील ओपन जिम मधील चार झाडांच्या मध्ये इंस्टॉलेशन तयार झाले. काही वर्षात जसा या झाडांना प्लास्टिकचा विळखा पडला तसाच पूर्ण पृथ्वीला पडू शकतो यावर वेळीच विचार करा असा इशाराच प्लास्टिकने दिला आहे.
४ झाडांना दहा हजार विळख्या घालू शकतात तर लाखो टन प्लास्टिक संपूर्ण पृथ्वीला सहजपणे विळखा घालू शकता असे या कलाकृतीतून सांगण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त याचे उद्घाटन माजी परिवहन सदस्य राजेश मोरे, महापालिका उपायुक्त मनीष जोशी आणि पर्यावरण व घनकचरा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या शालेय विद्यार्थी व स्वत्वचे कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. हे कायम स्वरुपी इंस्टॉलेशन पुढील काही महिने लोकांसाठी पाहण्यास खुले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, विघटन व शून्य कचरा मोहीम नागरिकांपर्यंत अशा कलाकृतीद्वारे पोहोचावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे असे स्वत्वचे श्रीपाद भालेराव यांनी सांगितले.