लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : गतवर्षी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून थेट ५० रुपये केले होते, त्याला सर्व स्तरातून विरोध झाला होता; परंतु कोविड काळात रेल्वेस्थानकात जास्त गर्दी होऊ नये यासाठी रेल्वेने तो निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा ते तिकीट १० रुपये केल्याची माहिती समोर येत असली तरी याबाबत रेल्वेच्या मुंबई विभागात मात्र ते स्पष्ट होऊ शकले नाही. कारण या ठिकाणी कोविड निर्बंधांच्या काळात स्थानकात गर्दी होऊ नये यासाठी फलाट तिकीट विक्री बंद ठेवली आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षित असलेल्या प्रवाशांना स्थानकात जाऊ देत आहेत.
तसेच ज्यांनी १५ ऑगस्टनंतर कोविड प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन रेल्वेपास काढला आहे त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. फ्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली असून अद्याप ते सुरू करण्याचे नियोजन नसून प्रवासी सहकार्य करत असल्याचे सांगण्यात आले.
------------------------
कोविडकाळात प्रवासाची मुभा मिळाल्याने आधी आरटीपीसीआर, अँटिजन टेस्टची अट होती, त्यामुळे ज्यांना प्रवास करायचा होता तेच अटी-शर्थी पूर्ण करून फ्लॅटफॉर्मवर येत होते. त्या काळात गतवर्षी कोणीही प्लॅटफॉर्म तिकिटांची मागणीही केली नाही. त्यातच ज्यांना प्रवास मुभा होती त्यांनाच बाहेर पडता येत होते, त्यामुळे त्याव्यतिरिक्त नागरिक स्टेशन परिसरातदेखील आले नाही. त्यांनी पूर्ण सहकार्य केले. तसेच ज्यांनी त्या सुविधेची मागणी केली, त्यावर त्यांना सध्या सेवा बंद असल्याचे सांगितल्यावर त्यांनी वस्तुस्थिती समजून सहकार्याची भूमिका घेतल्याचे ठिकठिकाणी निदर्शनास आले.
----------
कोविड काळात लांब पल्ल्याच्या रेल्वे, उपनगरी लोकल सुरू झाल्यापासून आता सप्टेंबर २०२१ पर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्लॅटफॉर्म तिकीट सेवा बंद आहे. पुढील आदेश येईस्तोवर ती बंद राहील, तसेच जसा बदल होईल तशी सेवा सुरू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात येईल.
-जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे
----------------
मुंबई विभागातून उत्तर, दक्षिण, कोकण सगळीकडे रेल्वे सोडण्यात येत आहेत.
मुंबई-सेवाग्राम
मुंबई-लखनऊ
मुंबई-सोलापूर
मुंबई-चेन्नई
मुंबई-दिल्ली
मुंबई-हैदराबाद
मुंबई-मंगलोर
मुंबई-कलकत्ता
दिवा-सावंतवाडी
दिवा-रत्नागिरी
मुंबई-नांदेड, औरंगाबाद
-----------