ठाणे : प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतील जिल्ह्याच्या विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या चार स्पर्धकांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सत्कार होणे अपेक्षित होते; परंतू जिल्हा प्रशासनाला त्याचा विसर पडल्याची गंभीर बाब विद्यार्थ्यांच्या पालकांनी निदर्शनास आणून देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय पातळीवर ‘खेलो इंडिया’ ही पहिली स्पर्धा मागील वर्षी दिल्ली येथे घेण्यात आली. यामध्ये चारवी पुजारी, पूर्वा किरवे, अनन्या सोमण, पुष्कर पाटील आणि आर्यन लांडगे या ठाणे जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला. त्यांचा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याहस्ते सन्मान होणे अपेक्षित होते, पण तो झाला नसल्याची खंत पालकांकडून व्यक्त करण्यात आली. यंदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांकडून झाला आहे. त्यांच्या आधी उत्तीर्ण झालेल्या पाच विजेत्यांचा जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत पालकांकडून व्यक्त होत आहे.देशात ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. यावेळी या स्पर्धा पुण्याच्या बालेवाडी येथे पार पडल्या. जिल्ह्यातील आठ विद्यार्थी यंदाच्या स्पर्धेत उत्तीर्ण झाले. त्यांचा सत्कार जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते साकेत मैदानावर झाला. बालेवाडी येथे शालेय मंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते त्यांचा सन्मानचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला होता.‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत यावर्षी सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या दहा खेळाडूंचा सत्कार पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते झाला. याप्रमाणेच मागील वर्षी विजयी ठरलेल्या सर्व खेळाडूंनादेखील लवकरच जिल्हाधिकाºयांच्याहस्ते सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार झाला. एक वर्ष झाल्यामुळे मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार लवकरच जिल्हाधिकाºयांच्याहस्ते करण्याचे नियोजन आहे.- शरद कलावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे
‘खेलो इंडिया’च्या विजेत्यांचा पडला विसर !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:56 AM