अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. येथील छाया रुग्णालयातील रुग्णांना दिलेल्या इंजेक्शनमुळे त्रास झाला होता. या प्रकारानंतर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णालयांची तपासणी केली. रुग्णांना अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते. ते इंजेक्शन शासनामार्फत देण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वत्र हेच इंजेक्शन वापरण्यात येत आहे. त्यामुळे इंजेक्शनमध्ये काही गोंधळ झाल्याचा किंवा इंजेक्शनची मुदत संपल्याचा शक्यतेला डॉक्टर कैलास पवार पूर्ण विराम दिला आहे. मात्र, छाया रूग्णालयात औषध हाताळणीमध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झाल्या असतील किंवा इंजेक्शनसाठी वापरण्यात आलेल्या सुईमध्ये गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉक्टर कैलास पवार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. याशिवाय, इंजेक्शनचा त्रास झालेले रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.
रुग्णांच्या जीवाशी खेळ; मुदतबाह्य औषध नसल्याचा दावा, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 1:41 AM