कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ३४३ आरक्षित भूखंड असून त्यापैकी काही भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमणे महापालिकेने हटवली आहेत. आरक्षित भूखंडांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता या भूखंडांच्या चोहोबाजूंनी झाडे लावण्याचा व हे सर्व भूखंड आरक्षणे विकसित होईपर्यंत खेळण्याकरिता उपलब्ध करून देण्याची शक्कल महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लढवली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील ३४३ आरक्षित भूखंड अतिक्रमणांपासून वाचवण्याकरिता केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. खेळाडूंना खेळण्याकरिता हे भूखंड उपलब्ध करून दिले असल्याने ज्या संस्था आरक्षित भूखंड राखण्याकरिता इच्छुक असतील त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सोमवारी पार पडलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत ही माहिती आयुक्तांनी घेतली. हे आरक्षित भूखंड आवारभिंत व कुंपण घालून संरक्षित करावे, असे आयुक्तांनी संबंधित अधिकारी वर्गास सांगितले.
रस्ते स्वच्छ केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी मायक्रोप्लानिंग करावे. शहराची स्वच्छता नीट झाली पाहिजे, असे प्रभाग अधिकाऱ्यांना बजावले. पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारती खाली करून त्या पाडण्यात याव्यात. त्याचबरोबर अनधिकृत इमारती पाडण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले.
--------------------------