ठाणे : गावदेवी मैदानाचा वापर हा खेळण्यासाठीच होणार असून याठिकाणी भूमिगत पार्किंगचे काम झाल्यानंतर मैदान पूर्ववत करण्याची ग्वाही उच्च न्यायालयात ठाणे महापालिकेने दिली आहे. त्यामुळे जोपर्यंत या याचिकेमध्ये आपल्याकडून नवा मुद्दा उपस्थित केला जाणार नाही, तोपर्यंत सुनावणी होणार नसल्याची माहिती याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या भूमिगत पार्किंगबरोबरच शहरासाठी तयार करण्यात आलेेले पार्किंग धोरणदेखील राबवण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.ठाणे स्टेशनजवळील वाहतूककोंडी सोडवण्याकरिता ठाणे महानगरपालिका भगीरथ प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून गावदेवी मैदानावर उभारण्यात येणारी भव्य भूमिगत पार्किंग तब्बल २७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम होणार असून यामध्ये १३० चारचाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. मात्र, मैदानाला धक्का न लावता पार्किंगचे काम करण्यात यावे, यासाठी डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीदरम्यान महापालिकेने पार्किंगचे काम झाल्यावर मैदान पूर्ववत करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयास दिली आहे.
पार्किंग धोरणही प्राधान्याने राबवण्याची सूचना - भूमिगत पार्किंगबरोबरच संपूर्ण शहरासाठी तयार करण्यात आलेले पार्किंग धोरणही राबवा, अशी सूचना न्यायालयाने ठाणे महापालिकेला केली आहे. यावर पालिका आयुक्तांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.- २००८ साली ठाणे महापालिकेने वाहतूक सर्वेक्षण केले होते. त्याआधारे २०१४ साली पार्किंग धोरण बनवण्यात आले. राष्ट्रीय नागरी वाहतूक पॉलिसीच्या आधारावर हे धोरण बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये रस्ते वाहनमुक्त आणि पार्किंगचे दर अधिक आकारणे, हा मुख्य उद्देश आहे.- ज्यामुळे नागरिक अधिकाधिक सार्वजनिक वाहनांचा उपयोग करतील. हे धोरण २०१५ साली राबवणे सुरू होणार होते. पालिकेने २७ ठिकाणी अशा पद्धतीने पार्किंग सुरू करण्याची तयारी दाखवली. मात्र, यातील तीनच ठिकाणांवर प्रत्यक्ष काम होऊ शकले.
वाहनांसाठी फक्त चार टक्के जागा वापरणार भूमिगत पार्किंगचे काम झाले, तरी मैदानाचा वापर हा खेळांसाठीच होणार असून, त्यासाठी मैदान पूर्ववत करून देण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. केवळ भूमिगत पार्किंगमध्ये वाहने आत आणि बाहेर जाण्यासाठी चार टक्के जागेचा वापर होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. याशिवाय, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा दावादेखील प्रशासनाने केला आहे.