पालघर : ‘मोदीजीने जो बात एक बार बोल दी तो बोल दी, एक बार कमिटमेंट कर दी तो वो किसीकी भी नही सुनते,’ असे वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी वाढवण बंदराबाबत केले असून स्थानिकांमध्ये संतप्त भाव उमटले आहेत. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा नव्या भारताचे चित्र डोळ्यांसमोर ठेवून बनविण्यात आलेला असून या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आलेला आहे, असे मत भाजपच्या प्रदेश प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी पालघर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पंतप्रधान मोदी सरकारच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते, परिवहनपासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनविण्याचा संकल्प असून हा सर्वांचा आणि सर्वांसाठीचा अर्थसंकल्प आहे. कोरोना महामारीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असला तरी आर्थिक स्रोतामध्ये वाढ करण्यासाठी नवे कर लावणे स्वाभाविक होते. मात्र या अर्थसंकल्पात करांमध्ये काही वाढ करण्यात आलेली नाही आणि महागाई दरदेखील पाच टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात आलेला आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो, मालवाहतूक, मार्गिका, बंदरे, विमानतळ या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र ७ लाख ५४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.हा अर्थसंकल्प गरिबांचे कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित असून उज्ज्वल योजनेचा लाभ आतापर्यंत ८ कोटी महिलांना देण्यात आला आहे. स्थलांतरित मजुरांना ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना पोर्टलने जोडण्यात आले आहे. महिलांना दिवस-रात्र अशा सर्व पाळ्यांत काम करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आरोग्यविषयक तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३७ टक्क्यांनी वाढ करीत ९४ हजार कोटींवरून २.३८ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आल्याचे प्रवक्त्या शालिनी यांनी सांगितले. दरम्यान, भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या या वक्तव्यानंतर पालघरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘मोदीजीने एक बार कमिटमेंट कर दी तो वो किसीकी भी नही सुनते’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 4:29 AM