ठाणे- ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
उद्घाटनाच्यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीतून सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कालच (गुरुवारी) नवी मुंबईत देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन केलं. त्यामध्ये देखील केंद्राचा मोठा सहभाग आहे. मी मराठीत बोलतोय, कारण नरेंद्र मोदी यांना मराठी चांगलं समजतं, असं उद्धव ठाकरे म्हणताच नरेंद्र मोदींनाही हसू आल्याचं दिसून आलं.
मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते. त्याचं जाळ देशभर पसरतं. मुंबईवरुन सुरुवातीला ठाणे पर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली आणि त्याचा विस्तार देशभर झाला. काल नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गीकांमुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गीकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गीका असतील. या दोन्ही मार्गीकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर आज पासून ३६ नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
अनेक आव्हानांचा सामना करत ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे. या मार्गीकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकामासाठी कामगार, अभियंते यांनी दिवसरात्र मेहनत करुन राष्ट्रनिर्माणाच्या कामात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.