तानाजी गंगावणे
घरखरेदीला घरघर लागल्याची ओरड होत असून घरांची नोंदणीदेखील मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. स्टॅम्पड्युटी जरी प्रत्यक्षात पाच टक्के असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थाकर आणि नव्याने आलेला मेट्रोचा अधिभार यामुळे स्टॅम्पड्युटीचा खर्च सात टक्क्यांवर गेला आहे. त्याचा परिणाम उपनिबंधक कार्यालयाच्या उत्पन्नावरही झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घरनोंदणी करणाऱ्यांची संख्याही घटली आहे. मात्र, असे असले तरी विभागाला दिलेले लक्ष्य यंदा १०० टक्के पूर्ण होणार आहे.गतवर्षीचे ११३ टक्के उत्पन्न यंदा अशक्यमेट्रो सुरु होण्यापूर्वीच विकासकांना दोन टक्के सेस तर घरनोंदणी करणाऱ्यांना एक टक्का रक्कम मुद्रांक शुल्करूपाने भरण्यास सांगितले असून त्याची सुरुवात झाली आहे. घरांची नोंदणी करताना मेट्रोवरील अधिभार हा पूर्वलक्षीप्रभावाने घेण्याचे शासनाने निश्चित केले आहे. घरखरेदीच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के घट झाली आहे. त्याचा परिणाम घरनोंदणीवरही झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षी उपनिबंधक कार्यालयाच्या ठाणे आणि कल्याण तालुक्यांसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी दोन हजार ५७९ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र, दिलेल्या लक्ष्यापेक्षा या विभागाने ११३ टक्के जास्त उत्पन्न प्राप्त केले होते. त्यामुळेच यंदा या विभागाचे लक्ष्य तीन हजार ३२१ कोटींचे देण्यात आले आहे. आतापर्यंत या लक्ष्याच्या ७८ टक्के वसुली झाली आहे. परंतु मार्च अखेरपर्यंत आम्ही आमचे लक्ष्य साध्य करू, असे वाटत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्न कमी असणार आहे. मागील वर्षी ११३ टक्के उद्दिष्ट साध्य केले होते. यंदा कसेबसे १०० टक्क्यांच्या आसपासचे उद्दिष्ट साध्य होईल. एकीकडे घरांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घरे घेणे काहीसे अवघड झाले आहे. त्यात इतर करांचा भार असल्याने त्याचाही परिणाम म्हणून घरनोंदणीत घट झाली आहे.
मागील आर्थिक वर्षात ठाणे शहर आणि कल्याण तालुक्यात एक लाख १९ हजार ९२२ घरांची नोंदणी झाली होती. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक लाख सात हजार १४७ घरांची नोंदणी झाली आहे. याचाच अर्थ मागील वर्षीच्या तुलनेत घरांची नोंदणी कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. ५० लाखांचा फ्लॅट असेल तर त्यासाठी तीन लाख ५० हजारांच्या आसपास स्टॅम्पड्युटी भरावी लागते आणि त्यावर पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी ३० हजारांच्या आसपास लागणारी रक्कम वेगळीच. त्यातही, मागील तीन ते चार वर्षांपासून स्टॅम्पड्युटी पाच टक्केच आहे. त्यामध्ये मागील वर्षापर्यंत एक टक्का स्थानिक स्वराज्य संस्थाकर लागू होता. आता त्यात आणखी एका टक्क्याची भर पडल्याने स्टॅम्पड्युटी सात टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे याचाही परिणाम घरनोंदणीवर झाल्याचे दिसत आहे.(सहजिल्हा निबंधक वर्ग-२ ठाणे शहर)- शब्दांकन : अजित मांडके