ठाणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या तृतीय वर्ष कला-मराठी अभ्यासक्र यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांच्या दोन पुस्तकांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे दशावतार व माझा आवाज या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन एकाच दिवशी ठाण्यात झाले होते. डॉ. केळुस्कर यांची पहिल्यांदा दोन्ही पुस्तके अभ्यासक्रमासाठी निवडल्याने त्यांनी ‘लोकमत’जवळ आनंद व्यक्त केला आहे.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २०२० - २१ पासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मराठी लोकरंगभूमी या विषयासाठी दशावतार तर आधुनिक समाज माध्यमांसाठी लेखन व संवाद या विषयासाठी माझा आवाज ही दोन पुस्तके पुढील तीन वर्षासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासली जाणार आहे. अनघा प्रकाशनच्यावतीने एप्रिल २०१९ मध्ये या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला होता. डॉ. केळुस्कर यांनी दशावतार पुस्तकासाठी सहा वर्षे संशोधन केले होते. दशावतराच्या रुपात मालवणी मुलखातील लोककला पहिल्यांदाच खान्देशात अभ्यासली जाणार आहे. यात दशावतराचा प्रयोग, त्याची निरीक्षणो, कलाकाराची जीवनमूल्ये, लोककलेतून देण्यात आलेले नैतिकतेचे धडे हे सर्व यात मांडण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रादेशिक आदानप्रदान होणार असल्याचे मत डॉ. केळुसकर यांनी व्यक्त केले. संवादाच्या माध्यमांसाठी माझा आवाज हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. निवदेनाची भाषा, त्याची शैली, आवाज कितपत असावा हे सर्व यात अभ्यासपूर्ण मांडण्यात आले आहे. अनघा प्रकाशन, ठाणे यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रकाशित केले हे ग्रंथ सन २०२०-२१ पासून अभ्यासक्रमात लागू असतील.
'मराठी लोकरंगभूमी' या विषयाच्या अभ्यासासाठी दशावतार (कोकणी): स्वरूप व वैशिष्ट्ये आणि लोकरंगभूमीची संकल्पना सोदाहरण विशद करणारा 'दशावतार' हा ग्रंथ विद्यार्थाना अत्यंत उपयोगी पडेल. डॉ.केळुसकर यांनी आपल्या पीएचडी संशोधनावर आधारित या ग्रंथात कोकणचा दशावतार सांगोपांग समजावून दिला आहे. त्यांचा 'माझा आवाज' हा ग्रंथ आकाशवाणीमधील त्यांच्या ३६ वर्षाच्या अनुभवावर आणि आवाजशास्त्राच्या प्रदीर्घ अभ्यासावर आधारित असून 'आधुनिक समाज माध्यमांसाठी लेखन व संवाद' या विषयाच्या अभ्यासासाठी सुयोग्य आहार व व्यायाम,निवेदन-वृत्तनिवेदन-सूत्र संचालन, क्षेत्रीय वृत्तकथन कसे करावे वैगरे संबंधी 'माझा आवाज' मध्ये अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे.
माझ्या दोन्ही वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांची निवड झाली, याचा अतिशय आनंद आहे. मी गेली ४० वर्षे लिखाण करीत असून २४ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. माझी एक मालवणी कविता नववीच्या मराठी पुस्तकात समाविष्ट करण्यात आली होती. विद्यापीठाने दिलेला हा सुखद आश्चर्याचा धक्का आहे असे डॉ. केळुस्कर यांनी सांगितले.