डोंबिवली : महाराष्ट्र साहित्य परिषदेने (मसाप) कविवर्य केशवसूत यांच्या १११ व्या स्मृतिदिनाचे निमित्तसाधत रविवारी घेतलेल्या त्यांच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांनी केशवसूत यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शहरात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी हा कार्यक्रम येथील टिळकनगर शाळेच्या सभागृहात झाला. यावेळी निवडक १५ निमंत्रित कवींच्या कविता आणि केशवसूत यांच्या कवितांचे वाचन झाले. १८८८ ते १९०६ हा केशवसूतांचा काळ. या काळातील कविता आजच्या परिस्थितीत किती समर्पक आहेत, याचाच प्रत्यय उपस्थितांना आला. अस्पृश्यांच्या प्रश्नाबद्दल कोणतीही घोषणा न करता त्यांच्या मुलांच्या मनातील शंका उच्चारून या प्रश्नाविषयी वाटणारी तळमळ केशवसूतांनी आपल्या कवितेतून मांडली होती, असे अरुण गवळी यांनी सांगितले. ३ सप्टेंबर १८८८ मध्ये केशवसूतांनी लिहिलेल्या ‘अत्यंजाच्या मुलाचा पहिला प्रश्न’ हिचे वाचन करून त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. अनुसया कुंभार यांनी ‘प्रीती’ ही कविता सादर केली. केशवसूतांनी या कवितेतून प्रेमविषयक तत्वज्ञान अत्यंत साध्या व सोप्या भाषेत या कवितेतून मांडले आहे. या कवितेला गेयता असल्यामुळे ही कविता म्हणजे गाणे वाटते. १०० वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली ‘मजुरावर उपासमारीची पाळी’ ही कविता विशाल सामाजिक जाणीव व्यक्त करते. त्या काळात प्रथमच हा विषय केशवसूतांनी कवितेतून मांडला होता. ही कविता दामोदर मोरे यांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. राजीव जोशी यांनी ‘झपूर्झा’ ही कविता सादर केली. नवनिर्मिती आवश्यक असणारी तन्मयता म्हणजे ‘झपूर्झा’ हा शब्द मराठी भाषेला केशवसूतांनी दिलेली देणगी आहे. हेमंत राजाराम यांनी विद्यार्थ्यांप्रत ही कविता सादर केली. इंग्रजी म्हणीवरून केशवसूतांनी ही कविता सूचली असावी, असे बोलले जाते. तीच कविता मृणाल केळकर यांनी, ‘काट्यावाचून गुलाब’ सादर करून उपस्थितांना जिंकून घेतले. वृंदा कौजलगीकर यांनी ‘काव्य कोणाच’े ही कविता सादर केली. दया घोंगे यांनी ‘स्फूट विचार’, किरण सोनावणे यांनी ‘मूर्तीभंग,’ सुलभा कोरे यांनी ‘प्रशस्तीपत्र’ या कविता सादर केल्या. केशवसूतांनी निराशेवर मात करण्यासाठी लिहिलेली ‘फुलपाखरू’ ही कविता लीला शाह यांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. प्रविण दामले यांनी ‘आम्ही कोण,’ गजानन गावंड यांनी ‘गोफण केली छान’ या कवितांचे वाचन केले. जयंता कुलकर्णी यांनी ‘टू अ पोईट’ ही कविता सादर केली. विशेष म्हणजे ही कविता २१ एप्रिल १८९१ मध्ये कल्याण येथे लिहिल्याचे संदर्भ आढळतात. प्रज्ञा कुलकर्णी यांनी ‘तुझे नाम मुखी’ या अभंगाने कार्यक्रमाचा शेवट केला. कार्यक्रमाचे निवदेन नारायण लाळे, शुक्राचार्य गायकवाड यांनी केले. प्रस्ताविक सुरेश देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना नारायण लाळे यांची होती. यावेळी ज्येष्ठ कवी नीलकंठ कदम, संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, ज्येष्ठ साहित्यिक आणि मसापचे अध्यक्ष वामनराव देशपांडे, उपाध्यक्ष सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डोंबिवलीकर साहित्यिकांनी दिला कवी केशवसूत यांच्या स्मृतींना उजाळा
By admin | Published: November 08, 2016 2:13 AM