- जान्हवी मोर्येडोंबिवली : ‘अशीच अमुची आई असती...’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘गोल असे ही दुनिया, आणिक गोल असे रुपया,’ अशी एकाहून एक सरस गीते ज्यांच्या लेखणीतून उतरली ते महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त कवी मधुकर जोशी यांच्यावर वयाच्या ८८ व्या वर्षी ‘कुणी घर देता का घर?,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.जोशी हे आयरे येथील ४० वर्षे जुन्या ‘हेरंब’ इमारतीत राहतात. मात्र, ती धोकादायक झाल्याची नोटीस केडीएमसीने बजावली आहे. त्यामुळे बिल्डरने रहिवाशांना जागा रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे आता जायचे कुठे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे.हेरंब या चार मजली इमारतीत ४३ भाडेकरू राहत होते. पण जागा रिकामी करण्याची नोटीस दिल्याने ४० जणांनी जागा सोडल्या आहेत. आता अवघे तीन कुटुंबे राहत आहेत. डोंबिवलीत मागील वर्षी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी जोशी यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पण संमेलन संपले व साहित्याच्या सारस्वतांना त्यांचा विसर पडला आहे. संमेलनानंतर ते फिरकले देखील नाहीत, अशी खंत जोशी यांनी बोलून दाखवली.जोशी म्हणाले, जागेसाठी खूप पैसे लागतात. ते कुठून आणू? डिपॉझिट खूप सांगतात. माझ्याकडील तुटपुंज्या पैशांमुळे मला भाडेही भरणे शक्य नाही. ४० वर्षे मी नोकरी केली आहे. पण कधीही सरकारकडे जागा मागितली नाही. कारण सरकारवर माझा विश्वास नाही. माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कवी शांता शेळके, कवी कुसुमाग्रज यांची घरे ही मोडकी होती. सरकारने महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला मात्र त्याबरोबर काही ठोस अशी रक्कम दिली नाही. कविता लेखनाची आपण तपश्चर्या केली आहे. पण साहित्यात त्याला फार किंमत नाही. हिंदी भाषिक कवीला जितका मान आहे, तेवढा मान सन्मान मराठी कवीला मिळत नाही. एकही मराठी कवी भरपूर मिळकत मिळवू शकलेला नाही. मंगेश पाडगावकर यांच्या सारख्या अनेक कवींनी आपला उदरनिर्वाह हा खाजगी नोकरी करून केला आहे. मराठी कवींची दुरवस्था झाली आहे. अनेक सत्कार झाले, पण ते त्या काळापुरते मर्यादित असतात. नंतर त्याला कुणी विचारत नाही. साहित्यात कवितेलाच मानाचे स्थान नाही. आता तर साहित्यालाच फार किंमत उरलेली नाही. नवोदित कवी ज्या कविता लिहितात त्या गद्य स्वरूपात असतात. पद्य कविता काळाच्या पडद्याआड लुप्त होत आहेत. साहित्यात रममाण असलेले आणि साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जोशी यांची होणारी उपेक्षा सरकारापर्यंत पोहोचणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पाच हजार भावस्पर्शी गीतेमधुकर जोशी यांनी पाच हजारांपेक्षा जास्त भावस्पर्शी गीते लिहिली आहेत. त्यात ‘अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती,’ हे अजरामर गीतही आहे. सध्या वयोमानानुसार फारसे लिखाण होत नाही. परंतु, नुकत्याच त्यांनी काही मंगलाष्टका लिहिल्या आहेत.
कवीला कुणी ‘घर देता का घर’, धोकादायक इमारतीला पालिकेने बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 1:50 AM