डोंबिवली : ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’ या आणि यासारख्या अनेक काव्यपंक्तींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी मधुकर जोशी (९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, डॉ. अविनाश, डॉ. शिरीष, जगदीश ही तीन मुले व डॉ. अलकानंद आणि अंजली या दोन मुली असा परिवार आहे.जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली स्मशानभूमीत अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.जोशी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील नीलकंठ हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वडिलांकडून साहित्याचे बाळकडू जोशी यांना मिळाले. जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांनी सहावीत असताना पहिली कविता ‘गांधीस वंदन’ (चंद्रकांता) ही कविता लिहीली. केंद्र सरकारच्या सेन्ट्रल एक्साईज विभागात काम करणारे जोशी १९८८ साली सेवानिवृत्त झाले. शास्त्रीय गायक डी. व्ही. पलुस्कर यांच्याशी जोशी यांचा परिचय झाला. पलुस्कर यांनी एचएमव्ही कॅसेट कंपनीचे संचालक जी. एन. जोशी यांच्याशी जोशी यांचा परिचय करुन दिला. १९५३ मध्ये आकाशवाणीवरून जोशी यांनी लिहिलेल्या भूपाळीचे प्रसारण करण्यात आले. जोशी यांच्या गीतांची पहिली रेकॉर्ड प्रकाशित झाली. या रेकॉर्डच्या एका बाजूला ‘मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ राधिकेचा राऊळी ये मोहना मधुसुदना’ हे होते. आकाशवाणीवरील भावसरगम कार्यक्रमाकरिता जोशी यांनी २१ सांगितीका लिहील्या होत्या. त्यातील ‘बाजीराव मस्तानी’ खूप गाजली होती. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘महाराष्ट्र गाथा’ नावाचे सदर सलग तीन वर्षे लिहिले होते. जोशी यांनी ९ ते १० हजार कविता लिहिल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन ‘गीत शिवायन’ यासह अनेक बालगीते त्यांनी लिहिली. लहान मुलांसाठी लिहिलेली ‘अशीच अमुची आई असती’, ‘झिम झिम झरती श्रावणधारा’, ‘नको ताई रूसू’, यासारखी हजारो गाणी जोशी यांच्या समृध्द लेखणीतून रसिकांच्या पसंतीस उतरली. कवीवर्य कुसुमाग्रज आणि ग.दि. माडगूळकर यांच्या कवितेची छाप त्यांच्यावर पडली. वयाच्या ८६ व्या वर्षीपर्यंत त्यांचे लिखाण सुरूच होते. जोशी यांच्या गीत लेखनाची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दखल घेऊन कौतुक केले होते. जोशी यांची ३५० गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
कवी मधुकर जोशी यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:43 AM