ठाणे : ब्रह्मांड कट्ट्याच्या वर्धापनदिन सोहळ्याची रंगत वाढवली ते प्रसिद्ध कवी, गीतकार, स्तंभलेखक, निवेदक, मोटिवेशन स्पीकर प्रसाद कुलकर्णी यांनी. कट्ट्याचे अध्यक्ष महेश जोशी यांनी कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. ‘प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे. आपुलकीची उब मिळताच, सहज उतू जाय रे.’ या हृदयाला हात घालणाऱ्या कवितेने सुरू झालेला मुलाखतीचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.
२१ मार्च २०२१ ला ब्रह्मांड कट्ट्याचा तपपूर्ती सोहळा ऑनलाइन माध्यमातून पार पडला. कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी त्यांचे कुटुंब तसेच ब्रह्मांड कट्टा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार मानून भविष्यातील योजनांची माहिती दिली. वर्धापनदिनाची सुरुवात संगीत विशारद रवींद्र देसाई यांच्या सुश्राव्य गायनाने झाली.
मनामनावर उत्कटतेचे अत्तर शिंपडणाऱ्या अनेक कविता कुलकर्णी यांनी सादर केल्या. ‘आई’ या कवितेने रसिकांची मने व्याकुळ केली. प्रेयसीला आर्त साद घालणाऱ्या काव्याने तर जणू प्रेमाची बरसात केली. मालवणी भाषेची गोडी दर्शविणाऱ्या ‘छनक छनक छनक छुम्’ या कवितेने वातावरण पैंजणांच्या नादाने भरून गेले.
-------------