लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अनेक प्रसिद्ध, ज्येष्ठ कवींनी काव्य सादरीकरणाबाबत केलेले मार्गदर्शन तसेच नवोदित कवींसोबत त्यांनीही सादर केलेल्या कविता, गीते आणि त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली उत्तम दाद अशा उत्साही वातावरणात नीलपुष्प साहित्य मंडळ आयोजित काव्यसंध्या रंगली. दर महिन्याप्रमाणे मे महिन्यातही काव्यसंध्या आयोजिली होती. या वेळी व्यासपीठावर नीलपुष्पचे अध्यक्ष कवी नारायण तांबे, उपाध्यक्षा कवयित्री ज्योती गोसावी, उपाध्यक्ष शरद घाटे तसेच कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शाखेच्या अध्यक्षा मेघना साने उपस्थित होत्या. या काव्यसंध्येत सहभागी कवींनी निसर्ग, आई, बाबा, प्रेम, आजच्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती, नोटाबंदी अशा अनेक विषयांशी निगडित विविध कविता या वेळी सादर केल्या. तर, गायक कलाकारांनी जुन्या आणि आताच्या अशा दोन्ही काळातील बहारदार मराठी गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. या वेळी मेघना साने यांनी कवितेबद्दल आपले मत व्यक्त केले. कवींच्या काव्य व गीतांना योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे. खासकरून, गायकांनी त्या गाण्याचे गीतकार, संगीतकार कोण आहेत, याची माहिती प्रेक्षकांना देऊन त्या कलाकारांचाही मान राखला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या काव्य संध्येदरम्यान कवी हरिश्चंद्र चाचड यांना नीलपुष्पचा कला नीलमणी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कवयित्री डॉ. प्रतिभा भिडे यांना केंद्रीय मानवाधिकार संरक्षण रक्षा सन्मान समारोह गोवा २०१७ चा समाज गौरव सन्मान पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
काव्य-गीतांनी रंगली नीलपुष्पची काव्यसंध्या
By admin | Published: May 12, 2017 1:43 AM