लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या परिस्थीतीवर कवी बोलले तर कवींचेही महत्त्व वाढेल. आपल्या आजूबाजूला जे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे त्यावरही भाष्य होणे गरजेचे आहे आणि ते त्याचवेळेला होणे गरजेचे आहे. असलेल्या परिस्थीतीवर भाष्य करण्यासाठी त्याचवेळी कवी, साहित्यिक पुढे आले पाहिजे. कवींना महत्त्व प्राप्त व्हावे असे पाऊल त्यांच्याकडूनही उचलले गेले पाहिजे असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.
डॉ. नागेश कांबळे यांनी कवी कुसुमाग्रज यांचे अप्रकाशित साहित्य संकलित केले आहे. या अप्रकाशित साहित्याचे क आणि ख या दोन ग्रंथाच्या अखंड मालेचे प्रकाशन राज यांच्या हस्ते करण्यात आले.
रावण पब्लिशिंग हाऊसच्यावतीने टीप टॉप प्लाझा येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. राज म्हणाले, कवी कुसुमाग्रज यांना मी बाळासाहेबांबरोबर भेटलो होतो. ती एकच त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती. आपण आपल्याच लोकांना मोठे करत नाही. आपली माणसे किती थोर होती हे परदेशात सांगितले जाते पण दुर्दैवाने ते आपल्याकडे सांगितले जात नाही. ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी आपल्या भाषणात आपल्याकडे अज्ञानाचे महामेरु खूप आहेत असा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन करत राज यांनी ह्ल्लीच्या मंत्र्यांना तर काही माहीतच नसते. ते वर्तमानकाळात नसतातच. हे सांगताना कवी कुसुमाग्रज यांची पन्नाशीची उमर गाठली ही कविता राज यांनी सादर केली.
ही कविता प्रत्येकाच्या घरात लावली पाहिजे आणि जो चुकत असेल त्याला ती पाठवली पाहिजे असे आवाहनही केले. ही कविता मंत्रालयात लावली होती, जागा चुकली होती असे मिश्किलपणे म्हणाले. मराठी साहित्य इतर भाषांत यायला हवे. मराठीपण जगाला कळण्यासाठी साहित्यासारखी दुसरी गोष्ट नाही असे ते शेवटी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. कांबळे, ज्येष्ठ कवी बागवे, अरुण म्हात्रे, प्रकाशक सुदेश हिंगलासपुरकर, रावण पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक अभिजीत पानसे, अभय गाडगीळ, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अभिजीत पेडणेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, कौशल इनामदार यांनी कुसुमाग्रज यांच्या कवीता, साहित्याचे सादरीकरण केले. समीरा गुजर हिने सुत्रसंचालन केले.