अंबरनाथ: रेल्वेच्या पॉइंटमनने प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. पॉइंटमननं स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे.रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोन दिवसांपूर्वी घडलेला संपूर्ण थरार सांगितला. 'शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलीला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणं गरजेचं आहे असा निर्धार मी मनाशी केला आणि जिवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेनं धावत सुटलो,' असं शेळके यांनी सांगितलं.
क्षणभर मलाही भीती वाटली, पण...; भरधाव ट्रेनसमोरून चिमुकल्याला वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणानं सांगितला थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 1:31 PM